'पुष्पा २' च्या प्रीमियर दूर्घटनेत जखमी झालेल्या मुलाची दिग्दर्शकाने घेतली भेट; करणार इतक्या लाखांची मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 09:07 IST2024-12-20T09:04:33+5:302024-12-20T09:07:39+5:30
'पुष्पा २: द रुल' हा सिनेमा दिवसेंदिवस बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवनवीन विक्रम रचत आहे.

'पुष्पा २' च्या प्रीमियर दूर्घटनेत जखमी झालेल्या मुलाची दिग्दर्शकाने घेतली भेट; करणार इतक्या लाखांची मदत
'Pushpa 2' director sukumar : 'पुष्पा २: द रुल' हा सिनेमा दिवसेंदिवस बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवनवीन विक्रम रचत आहे. अल्लू अर्जुनच्या या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा चालू आहे. साधारण ४ डिसेंबरच्या दिवशी सायंकाळी हैदरबाद येथील संध्या थिएटरमध्ये या चित्रपटाचा प्रीमियर सोहळा पार पडला होता. या प्रीमियर शोसाठी ‘पुष्पा’च्या हजारो चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. मात्र, यादरम्यान चेंगराचेंगरी होऊन यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं. शिवाय या चेंगराचेंगरीत एक मुलगाही जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. श्रीतेज असं त्या मुलाचं नाव आहे. या प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती. परंतु तेलंगणा उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर एका दिवसानंतर त्याची सुटका करण्यात आली होती.
दरम्यान, अगदी कालच्या दिवशी या जखमी मुलीच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद यांनी रुग्णालयात जाऊन त्याची भेट घेतली. त्यानंतर आता 'पुष्पा २' सिनेमाचे दिग्दर्शक सुकुमार यांनी देखील श्रीतेजची भेट घेतल्याचं कळतंय.
मीडिया रिपोर्टनुसार, दिग्दर्शक सुकुमार यांनी रुग्णालयात जाऊन जखमी मुलाच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यासोबतच त्याच्या कुटुंबीयांसोबत संवाद साधला. त्याचबरोबर या पीडित कुटुंबासाठी मदतीचा हात त्यांनी पुढे केला आहे. या संपूर्ण दुर्घटनेनंतर आता सुकुमार यांनी त्यावर दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी या कुटुंबाला जवळपास ५ लाखांची आर्थिक मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. सोशल मीडियावर सुकुमार यांच्या पीआरओ मार्फत पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की, "दिग्दर्शक सुकुमार यांनी रुग्णालयात जाऊन श्रीतेजची खास भेट घेतली. शिवाय त्यांच्या पत्नीने पीडित कुटुंबाला ५ लाखांची मदत केली आहे."