Pushpa 2: 'पुष्पा २'ची बॉक्स ऑफिसवरील गाडी गडगडली! मंडे टेस्टमध्ये पास की फेल? पाहा कलेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 09:42 IST2024-12-10T09:42:28+5:302024-12-10T09:42:46+5:30
'पुष्पा २' प्रदर्शनाच्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. पण, पहिल्या सोमवारी मात्र सिनेमाची गाडी बॉक्स ऑफिसवर थोडीशी गडगडल्याचं चित्र आहे.

Pushpa 2: 'पुष्पा २'ची बॉक्स ऑफिसवरील गाडी गडगडली! मंडे टेस्टमध्ये पास की फेल? पाहा कलेक्शन
Pushpa 2 : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २' ५ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. गेल्या कित्येक दिवसांपासून या सिनेमाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक होते. २०२१ साली प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा'चा सीक्वल असलेल्या 'पुष्पा २'साठी प्रेक्षकांना तब्बल ३ वर्ष वाट पाहावी लागली. 'पुष्पा' प्रमाणेच 'पुष्पा २'ला देखील प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. थिएटरमध्ये प्रदर्शित होताच सिनेमाचे शोज हाऊसफूल झाले आहेत. पहिल्या दिवसापासूनच अल्लू अर्जुनच्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील कमाईचे रेकॉर्ड मोडले आहेत. या सिनेमाचं पाच दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आता समोर आलं आहे.
'पुष्पा २' प्रदर्शनाच्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. पण, पहिल्या सोमवारी मात्र सिनेमाची गाडी बॉक्स ऑफिसवर थोडीशी गडगडल्याचं चित्र आहे. 'पुष्पा २'ने पहिल्या दिवशी १६४.२५ कोटींचा गल्ला जमवला. तर दुसऱ्या दिवशी ९३.८ कोटींची कमाई केली. शनिवारी 'पुष्पा २'ने ११९.२५ कोटी कमावले. तर रविवारी १४१.५ कोटींचा गल्ला जमवला. सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार, अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २' सिनेमाने पहिल्या सोमवारी ६४.१ कोटींची कमाई केली आहे. मंडे टेस्टमध्ये 'पुष्पा २' पास झाला असला तरी मात्र बाहुबली २चा रेकॉर्ड या सिनेमाला मोडता आलेला नाही.
प्रदर्शनानंतर पहिल्या सोमवारी सर्वाधिक कमाई करण्याचा रेकॉर्ड बाहुबली २ सिनेमाच्या नावावर आहे. या सिनेमाने पहिल्या सोमवारी ८० कोटींची कमाई केली होती. या लिस्टमध्ये ६४.१ कोटींची कमाई करत पुष्पा दुसऱ्या स्थानावर आहे. तर RRR सिनेमाने पहिल्या सोमवारी ४८.८ कोटी कमावले होते. त्यामुळे तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, 'पुष्पा २' सिनेमाने आत्तापर्यंत बॉक्स ऑफिसवर ५९३.१ कोटींचा गल्ला जमवला आहे.
'पुष्पा २'मध्ये अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना, फाहद फासिल या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. सुकुमार यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 'पुष्पा २ : द रुल'नंतर या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची घोषणादेखील करण्यात आली आहे. त्यामुळे आता 'पुष्पा ३'साठी प्रेक्षक उत्सुक आहेत.