'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 12:36 IST2024-04-30T12:36:09+5:302024-04-30T12:36:52+5:30

गणपती विसर्जन मिरवणुकीतील ढोलवादन पथकातील फोटोंमुळे झाली निवड

marathi actress Shruti Marathe to be seen in Devara Part 1 playing Jr NTR s wife s role | 'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार

'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार

साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरचा 'देवरा पार्ट 1' तेलुगू सिनेमा यावर्षी रिलीज होणार आहे. त्याच्यासोबत जान्हवी कपूर, सैफ अली खान, प्रकाश राज, राम्या क्रिश्नन अशी तगडी स्टारकास्ट आहे. विशेष म्हणजे सिनेमात एका मराठमोळ्या अभिनेत्रीचीही मुख्य भूमिका आहे. ज्युनिअर एनटीआरच्या (Jr NTR) पत्नीच्या भूमिकेत मराठी अभिनेत्री दिसणार आहे. कोण आहे ती?

'देवारा पार्ट 1' या तेलुगू सिनेमातून मराठी अभिनेत्री ज्युनिअर एनटीआरसोबत झळकणार आहे. ही अभिनेत्री आहे श्रुती मराठे (Shruti Marathe). श्रुती मराठेने याआधी तमिळ सिनेमांमध्ये काम केलं आहे. आता तिला हा महत्वाचा प्रोजेक्ट मिळाला आहे. श्रुतीची ज्युनिअर एनटीआरच्या सिनेमात तेही त्याच्या पत्नीच्या भूमिकेत कशी वर्णी लागली याविषयी सांगताना ती म्हणाली, "दोन वर्षांपूर्वी गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीतले ढोल वादनाचे फोटो मी पोस्ट केले होते. ते बऱ्यापैकी व्हायरल झाले. मी जेव्हा देवराच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांना भेटले तेव्हा त्यांनी माझ्या या फोटोंचं कौतुक केलं. त्यांना आपल्या विसर्जन मिरवणूक आणि ढोल पथकाचं खूप कुतुहल वाटत होतं. अगदी ज्युनिअर एनटीआरलाही माझे फोटो आवडले. " मुंबई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तिने हे सांगितलं.

ती पुढे म्हणाली, "हा माझा पहिलाच तेलुगू सिनेमा आहे. त्यामुळे मनात धाकधुक होतीच. भाषेचीही अडचण होती. पण मला टीमने सांभाळून घेतलं.  ते मला देवनागरीमध्ये लिहून द्यायचे. मी ते पाठ करुन शूट करायचे. माझे जास्त सीन्स हे ज्युनिअर एनटीआरसोबत आहेत. शूटिंगच्या पहिल्या दिवशी मी खूप नर्व्हस होते. पण त्यांनी मला सांभाळून घेतलं."

ढोलवादनाच्या फोटोंमुळे श्रुतीला ही भूमिका ऑफर झाली. त्यामुळे महाराष्ट्रीयन असल्याचा तिला सार्थ अभिमान वाटतो असंही ती म्हणाली. श्रुती मराठेचा 'अलीबाबा आणि चाळीशीतले चोर' हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. हा सिनेमा प्रेक्षकांचा भलताच पसंतीस पडला आहे. शिवाय ती नवऱ्यासोबत मिळून मालिकांची निर्मितीही करते.

Web Title: marathi actress Shruti Marathe to be seen in Devara Part 1 playing Jr NTR s wife s role