'महावतार नरसिंह' सिनेमाच्या स्क्रीनिंगवेळी मोठी दुर्घटना, PVR थिएटरचं छत अचानक कोसळलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 13:21 IST2025-08-04T13:21:05+5:302025-08-04T13:21:53+5:30
'महावतार नरसिंह' सिनेमा पाहायला गेलेल्या प्रेक्षकांना मोठ्या दुर्घटनेला सामोरं जावं लागलं आहे. या अपघातात काही जण जखमीही झाले आहेत

'महावतार नरसिंह' सिनेमाच्या स्क्रीनिंगवेळी मोठी दुर्घटना, PVR थिएटरचं छत अचानक कोसळलं अन्...
सध्या 'महावतार नरसिंह' चित्रपटाची सर्वांना उत्सुकता आहे. परंतु हा सिनेमा पाहायला गेलेल्या प्रेक्षकांना मोठ्या दुर्घटनेला सामोरं जावं लागतंय. गुवाहाटी शहरातील एका मॉलमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. ‘सिटी सेंटर मॉल’मधील पीव्हीआर (PVR) थिएटरमध्ये ‘महावतार नरसिंह’ या चित्रपटाचे प्रदर्शन सुरू असताना अचानक छताचा एक भाग कोसळला. या घटनेत तीन प्रेक्षक जखमी झाले असून, त्यामध्ये एक लहान मुलगाही आहे.
कशी घडली घटना?
ही घटना शनिवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घडली. चित्रपट सुरू असताना थिएटरच्या छताचा काही भाग तुटून खाली पडला आणि तिथे बसलेल्या प्रेक्षकांवर मलबा कोसळला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे थिएटरमध्ये मोठी घबराट पसरली. लोकांनी किंचाळत बाहेर धाव घेतली. जखमी प्रेक्षकांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
ही दुर्घटना नेमकी कशी घडली याबाबत प्रशासनाकडून चौकशी सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार, छताचा ज्या भागात मलबा पडला त्या भागाचं सीलिंग कमकुवत झालं होतं. त्याची देखभाल योग्य पद्धतीने न झाल्यामुळे हे घडले असावे, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर संबंधित थिएटर तात्पुरते बंद करण्यात आले असून, सुरक्षा तपासणी आणि दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे. 'महावतार नरसिंह' चित्रपट पाहायला लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक प्रेक्षक थिएटरमध्ये हाउसफुल्ल गर्दी करताना दिसत आहेत.