Lal Salaam Trailer: क्रिकेटभोवती फिरणारं धर्माचं राजकारण.. रजनीकांत - कपिल देवच्या 'लाल सलाम'चा ट्रेलर बघाच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 12:04 IST2024-02-06T12:03:21+5:302024-02-06T12:04:16+5:30
रजनीकांत - कपिल देव यांची विशेष भूमिका असलेल्या 'लाल सलाम'चा ट्रेलर रिलीज झालाय

Lal Salaam Trailer: क्रिकेटभोवती फिरणारं धर्माचं राजकारण.. रजनीकांत - कपिल देवच्या 'लाल सलाम'चा ट्रेलर बघाच!
सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांचे सिनेमे पाहणं ही सर्वांसाठी पर्वणी असते. रजनीकांत यांनी आजवर विविध सिनेमांमधून भारतातीलच नव्हे तर जगभरातील लोकांना त्यांच्या अभिनयाची भुरळ पाडली आहे. रजनीकांत यांनी काहीच दिवसांपूर्वी त्यांच्या 'लाल सलाम' (Lal Salaam) सिनेमाची घोषणा केली होती. रजनीकांत यांच्या वेगळ्या लूकची झलक पाहून सर्वांनाच 'लाल सलाम' ची उत्सुकता होती. अखेर नुकताच 'लाल सलाम' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. विशेष गोष्ट म्हणजे या सिनेमात रजनीकांतसोबत क्रिकेटपटू कपिल देव (Kapil Dev) सुद्धा विशेष भूमिकेत झळकणार आहेत.
रजनीकांत यांच्या 'लाल सलाम'चा ट्रेलर तामिळ भाषेत रिलीज करण्यात आलाय. सिनेमात क्रिकेट आणि धर्माभोवती गुंफलेलं राजकारण बघायला मिळतं. युवा खेळाडूंना क्रिकेट खेळताना धर्म आणि राजकारणाचा कसा दुर्देवी सामना करावा लागतो याची गोष्ट 'लाल सलाम'च्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतेय. सिनेमात विक्रांत आणि विष्णु विशाल प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत. याशिवाय सुपरस्टार रजनीकांत आणि दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव विशेष भूमिकेत झळकणार आहेत.
रजनीकांत यांची लेक ऐश्वर्याने 'लाल सलाम'चं दिग्दर्शन केलंय. रजनीकांत सिनेमात मोईदीन भाईची भूमिका साकारणार आहेत. हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. मुंबई, चेन्नई आणि पाँडिचेरी शहरांमध्ये सिनेमाचं शुटिंग झालंय. 'लाल सलाम' सिनेमा ९ फेब्रुवारी २०२४ मध्ये रिलीज होणार आहे. सर्वांना रजनीकांत यांचा हा आगामी सिनेमा पाहण्याची उत्सुकता लागली आहे. याशिवाय रजनीकांत आणि कपिल देव यांना मोठ्या पडद्यावर पहिल्यांदा एकत्र पाहण्यासाठी त्यांचे फॅन्स उत्सुक आहेत.