'या' सिनेमाने रिलीज होताच तोडलाय 'छावा'चा रेकॉर्ड; ५० लाखांचं बजेट अन् तब्बल ७५ कोटींंची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 14:23 IST2025-11-27T14:17:49+5:302025-11-27T14:23:09+5:30
साधी कथा अन् उत्तम विषय असलेल्या या सिनेमाने रिलीज होताच छावा, कांतारासारख्या सिनेमांचा रेकॉर्ड मोडला आहे. जाणून घ्या कोणता आहे हा सिनेमा?

'या' सिनेमाने रिलीज होताच तोडलाय 'छावा'चा रेकॉर्ड; ५० लाखांचं बजेट अन् तब्बल ७५ कोटींंची कमाई
बॉलिवूडच्या मोठमोठ्या सुपरस्टार्सच्या तगड्या बजेटच्या चित्रपटांना मागे टाकत, एका लो बजेट चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व यश मिळवले आहे. अंकित सखिया दिग्दर्शित आणि एका रिक्षा चालकाची कहाणी सांगणाऱ्या 'लालो: कृष्णा सदा सहायते' या गुजराती चित्रपटाने २०२५ मधील सर्वाधिक नफा कमावणारा भारतीय चित्रपट होण्याचा मान मिळवला आहे.
हा चित्रपट ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित झाला, पण त्याची कमाई आणि नफ्याचे आकडे थक्क करणारे आहेत. केवळ ५० लाख इतक्या कमी बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने जागतिक स्तरावर तब्बल ७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. याचा अर्थ, 'लालो'ने आपल्या बजेटच्या तुलनेत तब्बल १५० पट अधिक नफा मिळवला आहे. कमाईच्या तुलनेत झालेल्या या प्रचंड नफ्यामुळे 'लालो: कृष्णा सदा सहायते' या चित्रपटाने 'कांतारा: चॅप्टर वन', 'छावा' आणि इतर यशस्वी चित्रपटांनाही मागे टाकले आहे.
या चित्रपटाच्या ऐतिहासिक यशाने १९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जय संतोषी माँ' या चित्रपटाच्या विक्रमाची आठवण करून दिली आहे. त्यावेळी कमी बजेटमध्ये तयार झालेल्या 'जय संतोषी माँ'ने, अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांचा 'शोले' यांसारख्या बिग बजेट चित्रपटाला मागे टाकून १०० पटीहून अधिक नफा कमावला होता. आता 'लालो'ने जवळपास ५० वर्षांनी भारतीय सिनेमात असाच विक्रम करून दाखवला आहे, जिथे सुपरस्टार्सऐवजी सामान्य माणसाची कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
काय आहे चित्रपटाची कथा?
'लालो: कृष्णा सदा सहायते' या चित्रपटाची कथा एका रिक्षा चालकाभोवती फिरते, जो योगायोगाने एका फार्महाऊसमध्ये अडकतो. तिथे तो आपल्या भूतकाळातील अनेक गोष्टींचा सामना करताना त्याच्या मदतीला भगवान श्रीकृष्ण धावून येतात. रीवा राछ, श्रुहद गोस्वामी, करण जोशी आणि मिष्टी कडेचा या कलाकारांनी यात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होऊन सहा आठवडे उलटूनही, आजही तो बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे.