"थरथर कापतोय, शब्दच नाहीत...", थलपती विजयच्या रॅलीतील घटनेवर कमल हासन यांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 10:16 IST2025-09-28T10:16:06+5:302025-09-28T10:16:58+5:30
थलपती विजयच्या राजकीय रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीवर कमल हासन यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

"थरथर कापतोय, शब्दच नाहीत...", थलपती विजयच्या रॅलीतील घटनेवर कमल हासन यांची प्रतिक्रिया
तमिळनाडूतील करूर येथे तमिळगा वेत्री कझगम प्रमुख विजय याच्या एका भव्य राजकीय रॅलीत हजारो लोक जमले होते. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत किमान ३६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर ५० जण जखमी आहेत. प्रचंड गर्दीमुळे ही चेंगराचेंगरी झाली, ज्यामुळे अनेक जण बेशुद्ध पडले आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर विजयने ट्वीट करत दु:ख व्यक्त केले आणि सर्वांसाठी प्रार्थनाही केली. तर आता दाक्षिणात्य सेलिब्रिटींनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. ज्येष्ठ अभिनेते कमल हासन यांनी काय ट्वीट केलं वाचा.
थलपती विजयच्या राजकीय रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीवर कमल हासन यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी ट्वीट करत लिहिले,"मी अक्षरश: थरथरत आहे. करुरमध्ये झालेली घटना समजली आणि मला खूप दु:ख झालं. आश्चर्यही वाटत आहे. चेंगराचेंगरीमुळे ज्या निष्पाप लोकांनी आपले प्राण गमावले त्यांच्या कुटुंबाप्रती मी संवेदना व्यक्त करतो. हे दु:ख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दही नाहीत."
ते पुढे लिहितात, "मी तमिळनाडू सरकारला आवाहन करतो की या चेंगराचेंगरीतून बाहेर आलेल्या जखमी लोकांवर योग्य ते उपचार व्हावे आणि प्रभावित लोकांना दिलासा द्यावा ही विनंती."
நெஞ்சு பதைக்கிறது. கரூரிலிருந்து வரும் செய்திகள் பேரதிர்ச்சியையும் வேதனையையும் அளிக்கின்றன. கூட்ட நெரிசலில் சிக்கி உயிரிழந்த அப்பாவி மக்களுக்கு என் ஆழ்ந்த இரங்கலைத் தெரிவிக்கவும் வார்த்தைகளின்றித் திகைக்கிறேன்.
— Kamal Haasan (@ikamalhaasan) September 27, 2025
நெரிசலிலிருந்து மீட்கப்பட்டவர்களுக்கு உரிய சிகிச்சையும்,…
तसंच रजनीकांत यांनीही ट्वीट करत दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी लिहिले, "करुरमध्ये झालेली घटना अतिशय दु:खद आणि हृदयद्रावक आहे. ज्या लोकांचा यामुळे जीव गेला त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. तसंच जखमींप्रती सांत्वना आहे."
या दुर्घटनेनंतर तामिळनाडू सरकारने अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सार्वजनिक मदत निधीतून प्रत्येकी १० लाख रुपये आणि रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांना प्रत्येकी १ लाख रुपये देण्यात येणार असल्याचे जाहीर केले.दरम्यान, केंद्रीय गृह मंत्रालयाने विजय याच्या करूर रॅलीतील चेंगराचेंगरीच्या घटनेबाबत तामिळनाडू सरकारकडून सविस्तर अहवाल मागितला आहे. तर चेंगराचेंगरीच्या चौकशीसाठी तात्काळ एक सदस्यीय चौकशी आयोग स्थापन करण्याची घोषणा तामिळनाडू सरकारने केली आहे.