तब्बल ६ वर्षानंतर दाक्षिणात्य सिनेमात दिसणार तब्बू, 'या' प्रसिद्ध अभिनेत्यासोबत शेअर करणार स्क्रिन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 18:19 IST2026-03-23T18:18:20+5:302026-03-23T18:19:44+5:30
'भूत बंगला'च्या प्रदर्शनापूर्वी तब्बूला लागली लॉटरी; मिळाली 'या' बिग बजेट सिनेमाची ऑफर

तब्बल ६ वर्षानंतर दाक्षिणात्य सिनेमात दिसणार तब्बू, 'या' प्रसिद्ध अभिनेत्यासोबत शेअर करणार स्क्रिन
Tabu cinema: बॉलिवूडमधील काही दर्जेदार अभिनेत्रींपैकी एक म्हणजे तब्बू. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणाऱ्या तब्बूने हिंदीच नाही तर मराठी आणि साऊथ चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे. तब्बू कायम तिच्या विविध धाटणीच्या चित्रपटांसाठी ओळखली जाते. शेवटची ती क्रू सिनेमात पाहायला मिळाली. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता लवकरच तब्बू भूत बंगला या सिनेमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. अभिनेता अक्षय कुमारसोबत ती या चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. दरम्यान, या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच अभिनेत्रीचं नशीब फळफळलं आहे. तब्बूची एका दाक्षिणात्य चित्रपटात वर्णी लागल्याची माहिती मिळते आहे.
जवळपास सहा वर्षानंतर तब्बू दाक्षिणात्य सिनेमात झळकणार आहे. मिडिया रिपोर्टनुसार, तब्बू एका नवीन पॅन-इंडिया प्रोजेक्टद्वारे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पुनरागमन करण्यास सज्ज झाली आहे. या बिग बजेट प्रोजेक्टसाठी अभिनेत्रीला अप्रोच करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, या प्रोजेक्टमध्ये तब्बू दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता विजय सेतुपतीसोबत पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.त्यामुळे तिचे चाहते देखील प्रचंड उत्सुक आहेत. मात्र, अद्याप याबाबत तब्बूने स्वत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, तब्बूने प्रसिद्ध निर्माते पुरी जग्गनाथ यांच्यासोबत हातमिळवणी केली असून ‘स्लम डॉग 33 टेम्पल रोड’ या त्यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये ती झळकणार आहे. या चित्रपटात विजय सेतुपती आणि संयुक्ता यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्रपट सध्या पोस्ट-प्रॉडक्शनमध्ये आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट या वर्षा अखेरीस प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.