अरेच्चा! लोकप्रिय अभिनेता तिसऱ्यांदा चढला बोहल्यावर? व्हायरल फोटोने चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 09:44 IST2026-01-10T09:43:54+5:302026-01-10T09:44:46+5:30
मनोरंजन विश्वातून लोकप्रिय अभिनेत्याने तिसऱ्यांदा लग्न केलं असल्याची चर्चा समोर आली आहे. जाणून घ्या कोण आहे तो?

अरेच्चा! लोकप्रिय अभिनेता तिसऱ्यांदा चढला बोहल्यावर? व्हायरल फोटोने चर्चांना उधाण
मनोरंजन विश्वातून एका प्रसिद्ध अभिनेत्याने तिसऱ्यांदा लग्न केल्याची चर्चा समोर येत आहे. हा अभिनेता आहे भोजपुरी सुपरस्टार पवन सिंह. ५ जानेवारी रोजी पवन सिंह ४० वर्षांचा झाला. त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. मात्र, या फोटोंमध्ये एका 'मिस्ट्री गर्ल'ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून भोजपुरी अभिनेत्री महिमा सिंह आहे. पवन आणि महिमाने गुपचुप तिसरं लग्न केलं असल्याची चर्चा सुरु आहे.
पवन सिंहच्या वाढदिवसाच्या पार्टीत महिमा सिंह त्याच्या अगदी जवळ उभी असलेली दिसली. इतकेच नाही तर तिने आपल्या भांगेत लाल कुंकू भरले होते, ज्यावरून पवन सिंहने तिच्याशी गुपचुप लग्न केले असल्याचा अंदाज चाहत्यांनी बांधला आहे. या पार्टीत पवन सिंहने महिमाचा हात धरून केक कापला, ज्यामुळे त्यांच्यातील जवळीक स्पष्टपणे दिसून आली.
महिमा सिंहने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पवन सिंहसोबतचे खास फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये दोघेही शेकोटीजवळ बसून गप्पा मारताना दिसत आहेत. या फोटोंमुळे चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अनेकांना वाटतंय की पवन आणि महिमाने लग्न केलंय. तर काहींना ते त्यांच्या आगामी प्रोजेक्टसाठी एकत्र आले आहेत, असं वाटतंय.
या सर्व चर्चांवर पवन सिंह आणि महिमा सिंह यांनी मात्र मौन सोडले होते. या दोघांनी खरंच लग्न केलंय? की हे फक्त आगामी सिनेमाच्या शूटिंगनिमित्ताने एकत्र आले आहेत? याविषयी आगामी दिवसांत कळेलच. पवन सिंहचे पहिले लग्न नीलम सिंहसोबत झाले होते, परंतु तिने २०१५ मध्ये आत्महत्या केली. त्यानंतर २०१८ मध्ये त्याने ज्योती सिंहसोबत दुसरे लग्न केले. मात्र, गेल्या ४ वर्षांपासून त्यांच्यातील घटस्फोटाचा खटला सुरू आहे. महिमा सिंहसोबतच्या या फोटोंमागील सत्य अद्याप समोर आलेले नाही, मात्र यामुळे पवन सिंहच्या चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.