Video: श्रद्धा कपूरने घेतलं कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन; 'हा' मराठी अभिनेताही अभिनेत्रीसोबत दिसला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 09:50 IST2026-02-22T09:48:32+5:302026-02-22T09:50:14+5:30
श्रद्धा कपूर सध्या आगामी 'ईठा' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सिनेमाचं शूटिंग कोल्हापूरात असताना श्रद्धाने कोल्हापूरातील अंबाबाईचं दर्शन घेतलं. यावेळी एक प्रसिद्ध मराठी अभिनेता तिच्यासोबत दिसला.

Video: श्रद्धा कपूरने घेतलं कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन; 'हा' मराठी अभिनेताही अभिनेत्रीसोबत दिसला
श्रद्धा कपूर सध्या आगामी 'ईठा' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 'छावा' सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. तमाशा कलावंत विठाबाई नारायणगावकर यांच्या आयुष्यावर आधारीत हा सिनेमा आहे. या सिनेमात श्रद्धा कपूर विठाबाईंची भूमिका साकारत आहे. अशातच सिनेमाचं शूटिंग कोल्हापूरात असताना श्रद्धाने कोल्हापूरातील अंबाबाईचं दर्शन घेतलं. यावेळी एक प्रसिद्ध मराठी अभिनेता तिच्यासोबत दिसला. हा अभिनेता म्हणजे आनंद काळे.
'संभाजी' मालिकेत कोंडाजी फर्जंदच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेते आनंद काळे यावेळी श्रद्धा कपूरच्या मागे दिसून आले. आनंद कोल्हापूरचे असल्याने त्यांनीच श्रद्धा कपूर आणि 'ईठा' सिनेमाच्या टीमसाठी कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाची व्यवस्था केली असल्याची शक्यता आहे. यावेळी श्रद्धा कपूरचा साधेपणा चाहत्यांना चांगलाच भावला. तिने अंबाबाईसाठी साडी अर्पण केली. इतकी मोठी सेलिब्रिटी असूनही साधे कपडे परिधान करुन श्रद्धा कपूरने मंदिरात हजेरी लावली. यावेळी श्रद्धाला पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी एकच गर्दी केली होती. श्रद्धाने सर्वांना हात दाखवत प्रेमाने अभिवादन केलं.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'ईठा' सिनेमाचं शूटिंग आता अंतिम टप्प्यात आहे. सिनेमात श्रद्धा कपूरसह रणदीप हूडा, मोहम्मद झिशान अयुब हे लोकप्रिय कलाकारही झळकणार आहेत. या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षी २०२७ ला 'ईठा' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. तमाशा कलावंत विठाबाई नारायणगावकर यांच्या आयुष्याची गाथा या निमित्ताने देशभरातच नव्हे जगभरात पोहचेल, यात शंका नाही.