Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 22:11 IST2025-12-18T22:09:48+5:302025-12-18T22:11:15+5:30
Shilpa Shetty Income Tax Raid News: काल बॅस्टियन हॉटेलवर छापा टाकण्यात आला होता

Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
Shilpa Shetty Income Tax Raid News: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ झाली आहे. गुरुवारी १८ डिसेंबरला आयकर विभागाच्या पथकाने शिल्पाच्या मुंबईतील जुहू येथील घरावर छापा टाकला. ही कारवाई बंगळुरूमधील तिच्या प्रसिद्ध हॉटेल बॅस्टियन गार्डन सिटीशी संबंधित एका प्रकरणासंदर्भात करण्यात आली आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, आयकर विभागाचे पथके केवळ मुंबईतीलच नव्हे तर बंगळुरूमधील हॉटेलच्या ठिकाणीही छापा टाकून शोध मोहीम राबवत असल्याचे सांगण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलच्या आर्थिक व्यवहारांमध्ये आर्थिक अनियमितता आणि करबुडवेगिरीच्या तक्रारींनंतर हे छापे टाकण्यात आले. शिल्पा शेट्टीने २०१९ मध्ये बॅस्टियन हॉस्पिटॅलिटीमध्ये ५०% हिस्सा खरेदी केला होता. ही कंपनी उद्योगपती रणजीत बिंद्रा यांच्या मालकीची आहे. आयकर विभाग बॅस्टियन पबच्या आर्थिक नोंदी आणि खात्यांची बारकाईने तपासणी करत आहे.
१७ डिसेंबरलाही छापासत्र
बुधवारी १७ डिसेंबरला आयकर विभागाने शिल्पा शेट्टीच्या कर्नाटकातील बॅस्टियन रेस्टॉरंटवर छापा टाकला होता. आता तिच्या मुंबईतील घरावरही छापा टाकण्यात आला आहे. शिल्पा शेट्टी प्रसिद्ध अभिनेत्री तर आहेच, पण त्यासोबतच ती एक यशस्वी उद्योजिकादेखील आहे. ती मुंबई, गोवा, बेंगळुरू आणि इतर ठिकाणी बॅस्टियन नावाच्या लोकप्रिय रेस्टॉरंट चेनची मालकीण आहे. ही हॉटेल चेन खूपच आलिशान आहेत. शिल्पा या हॉटेल्सचे फोटो वारंवार सोशल मीडियावर शेअर करत असते. ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा खटला आणि बॅस्टियन छाप्यांदरम्यान शिल्पा शेट्टीने 'अम्माकाई' नावाचे एक नवीन रेस्टॉरंट उघडण्याची घोषणाही केली आहे.
बॅस्टियन बंद होणार?
गेल्या सप्टेंबरमध्ये शिल्पाचे मुंबईतील वांद्रे येथील प्रसिद्ध रेस्टॉरंट बॅस्टियन बंद होत असल्याची चर्चा होती. शिल्पाने सोशल मीडियावर एक क्लिप पोस्ट केली होती, ज्यामध्ये ती फोनवर म्हणत होती की, मी बास्टियन बंद करत नाहीये हे मी वचन देते. मला बरेच फोन आले आहेत, पण एवढे सर्व सांगितल्यानंतर मला बॅस्टियन बद्दलचे प्रेम नक्कीच जाणवते. बॅस्टियन बंद होणार नाही. आम्ही नेहमीच नवीन खाद्यपदार्थ सादर केले आहेत आणि ते कायम सुरूच राहिल.