Dhadak 2 Review: जातीवादाला प्रेमाची 'धडक'; कसा आहे सिद्धांत-तृप्तीचा 'धडक २'?
By संजय घावरे | Updated: August 1, 2025 15:47 IST2025-08-01T15:45:49+5:302025-08-01T15:47:33+5:30
धडक २ पाहायचा विचार करताय? वाचा हा रिव्ह्यू

Dhadak 2 Review: जातीवादाला प्रेमाची 'धडक'; कसा आहे सिद्धांत-तृप्तीचा 'धडक २'?
'धडक' हा चित्रपट मराठी 'सैराट'चा रिमेक होता. जातीवादाविरोधात आवाज उठवणारा हा चित्रपट 'परियेरुम पेरुमल' या तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे. जातीवाद जेव्हा उंबरठ्याच्या आत येऊ पाहतो, तेव्हा व्हाईट कॅालर लोकांचा खरा चेहरा समोर येतो. काही भागात आजही जातीवाद अस्तित्वात असल्याचे दिग्दर्शक शाजिया इकबाल यांनी या चित्रपटात दाखवले आहे.
कथानक : मागासवर्गीय निलेश अहिरवार आणि सवर्ण विधी भारद्वाज यांच्या प्रेमाची ही गोष्ट आहे. आरक्षणामुळे निलेशला लॅा कॅालेजमध्ये अॅडमिशन मिळते. त्याच कॅालेजमध्ये विधीही असते. पावलोपावली जातीवादाचा सामना करावा लागलेल्या निलेशला कॅालेजमध्ये पाऊल ठेवल्यापासूनच हिणकस वागणूक मिळते. मुक्त विचारांची विधी मात्र त्याला इंग्रजीसोबतच अभ्यासात मदत करता-करता अनाहुतपणे त्याच्या जवळ येते. आपल्या थोरल्या बहिणीच्या लग्नात ती निलेशलाही बोलावते. तिथे निलेशसोबत जे घडते त्यामुळे दोघांच्याही आयुष्याला कलाटणी मिळते.
लेखन-दिग्दर्शन : जाती-पातीचा विषय यापूर्वी बऱ्याचदा समोर आलेला असला तरी याचे सादरीकरण वेगळे आहे. संवाद अर्थपूर्ण असून, काही प्रसंग खऱ्या अर्थाने आपल्याच समाजव्यवस्थेची काळी बाजू दाखवतात. सुरुवातीपासूनच चित्रपटाची गती संथ वाटते. गीत-संगीत चांगले असले तरी 'धडक'पेक्षा कमीच आहे. लग्नगीताला 'झिंगाट'ची सर येत नाही. काही त्रुटी राहिल्या असल्या तरी काही दृश्ये अनपेक्षित धक्का देत उत्सुकता वाढवतात. क्लायमॅक्स छान आहे. वेशभूषेकडे आणखी लक्ष देण्याची गरज होती. प्रेमकथा कमी आणि जातीवाद जास्त असेच काहीसे झाले आहे.
अभिनय : सिद्धांत चतुर्वेदीने आपल्या व्यक्तिरेखेला अचूक न्याय दिला आहे. बालपणापासून जातीवादाचा तडाखा सहन केलेल्या तरुणाचा उठाव त्याने लीलया सादर केला आहे. तृप्ती डिमरीने सुरेख साथ दिली आहे. काही दृश्यांमध्ये ती खूपच प्रभावी वाटते. झाकिर हुसैन यांनी साकारलेले मुख्याध्यापक कौतुकास पात्र आहेत. शंकरच्या रूपातील सौरभ सचदेवा थरकाप उडविणारा आहे. अनुभा फतहपुरा व विपिन शर्मा यांनी आई-वडीलांची व्यक्तिरेखा संयतपणे साकारली आहे. साद बिलग्रामीने रोनीही चांगला रंगवला आहे.
सकारात्मक बाजू : कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन, अभिनय, गीत-संगीत
नकारात्मक बाजू : चित्रपटाची गती, शंकरची बेसलेस व्यक्तिरेखा
थोडक्यात काय तर ही टिपीकल लव्हस्टोरी नसून, सामाजिक संदेश देणारा रोमँटिक चित्रपट असल्याचे लक्षात ठेवून चित्रपट पाहायला हवा.