रेणुका शहाणेंनी सासरी पाळल्या सर्व रुढी-परंपरा; म्हणाल्या, "राणाजींनी कधीच मला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 17:04 IST2025-04-17T17:03:22+5:302025-04-17T17:04:08+5:30

"माझ्यासाठी तो खूप मोठा बदल होता", रेणुका शहाणेंनी सांगितल्या आठवणी

renuka shahane reveals how she follows all traditions in the ashutosh rana s family | रेणुका शहाणेंनी सासरी पाळल्या सर्व रुढी-परंपरा; म्हणाल्या, "राणाजींनी कधीच मला..."

रेणुका शहाणेंनी सासरी पाळल्या सर्व रुढी-परंपरा; म्हणाल्या, "राणाजींनी कधीच मला..."

अभिनेत्री रेणुका शहाणे यांना आपण सगळेच 'हम आपके है कौन'मधील भाभी म्हणून ओळखतो. नुकत्याच त्या 'दुपहिया' या वेबसीरिजमध्ये दिसल्या. शिवाय त्यांचा 'देवमाणूस' हा सिनेमा येतोय. रेणुका शहाणे मोजकं काम करतात पण खणखणीत करतात. २००१ साली रेणुका शहाणेंनी वयाच्या ३४ व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्न केलं. अभिनेते आशुतोष राणांशी त्यांचा प्रेमविवाह झाला. 

राणा कुटुंबात रुढी-परंपरा असल्याने रेणुका शहाणेंनाही त्याचं पालन करावं लागलं का यावर त्यांनी नुकतंच भाष्य केलं आहे. 'कॅचअप' युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत रेणुका शहाणे म्हणाल्या, "हो, मलाही करावं लागलं. प्रश्नच नाही. माझ्यासाठी तो खूपच मोठा बदल होता. मी अजूनही सासरी गेल्यावर डोक्यावर पदर घेते. माझ्या घरात तर असंच काही शक्यच नव्हतं. माझ्या मित्र मैत्रिणींच्या घरातही असं वातावरण नव्हतं. पण माझे सासरे आणि कुटुंबाचे आध्यात्मिक गुरु यांच्यामुळे काही गोष्टी कडक शिस्तीत पाळल्या जायच्या. एकदा का तुम्ही त्या कुटुंबातले झालात की हे शक्य होतं. माझी त्या कुटुंबाचा भाग व्हायची इच्छा होती. मला कोणीही जबरदस्ती केली नाही. राणाजींनी कधीच मला हे केलंच पाहिजेस असं सांगितलं नाही."

"मला असं वाटायचं की एक तर मी अभिनेत्री, सगळ्यांना हम आपके है कौन पाहिला होता. त्यामुळे मी मुंबईहून आलेली मुलगी वगे असं म्हणत आपोआपच एक अंतर तयार होतं. मला ते नको होतं. पण आता आम्ही इतके वर्षांपासून एकमेकांचे आहोत त्यामुळे प्रांताचं किंवा राज्याचं जे काही अंतर होतं ते सगळं गळून पडलं आहे. माझ्या ज्या जावा आहेत त्या माझ्या मस्त मैत्रिणीसारख्याच आहेत. आम्ही एकत्र धमाल करत असतो.  मी जर आडमुठेपणा केला असता तर हे मला मिळालं नसतं. आता मी बघते सासरी या पद्धत उरलेल्या नाहीत. आमच्या ज्या सुना आलेल्या आहेत त्या डोक्यावर पदर घेत नाहीत. आम्ही त्यांना म्हणतच नाही की घ्या. त्या जीन्स घालतात. मी जशी माझ्या घरी आहे तशा त्या असतात."

Web Title: renuka shahane reveals how she follows all traditions in the ashutosh rana s family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.