'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 13:57 IST2025-12-20T13:56:53+5:302025-12-20T13:57:44+5:30
अक्षय खन्नामुळे इतर सर्वांच्या भूमिका झाकोळल्या गेल्या?

'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' स्पाय थ्रिलर सिनेमा धुमाकूळ घालत आहे. सिनेमात रणवीर सिंह, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, आर माधवन, संजय दत्त अशी तगडी स्टारकास्ट आहे. मात्र सगळीकडे अक्षय खन्नाच्या स्वॅगचीच चर्चा आहे. रहमान डकैतची स्टाईल, डान्स सगळंच व्हायरल होत आहे. अक्षयने सर्वांनाच झाकोळलं अशी चर्चा सुरु आहे. यावर आर माधवनने नुकतीच प्रतिक्रिया दिली.
'धुरंधर'मध्ये आर माधवन आयबी प्रमुख अजय सन्यालच्या भूमिकेत आहे. सिनेमात त्याच्यापेक्षाही जा्सत अक्षय खन्नाच्याच भूमिकेची जोरदार स्तुती होत आहे. यामुळे माधवनला इर्ष्या वाटते का? यावर 'बॉलिवूड हंगामा'ला दिलेल्या मुलाखतीत आर माधवन म्हणाला, "असं अजिबातच नाही. उलट मी अक्षयसाठी खूप खूश आहे. त्याचं आज जे कौतुक होतंय त्यासाठी तो पूर्णत: पात्र आहे."
तो पुढे म्हणाला, "त्याला हवं असतं तर त्याने आतापर्यंत कित्येक मुलाखती दिल्या असत्या. पण तो आपल्या नवीन घरात शांत बसला आहे आणि शांतता एन्जॉय करत आहे. जे तो नेहमीच करतो. मला वाटत होतं की जेव्हा सर्वांचं लक्ष वेधून घेण्याची गोष्ट येते तेव्हा धुरंधर मध्ये मी अंडरडॉग आहे. पण अक्षय खन्ना वेगळ्याच लेवलवर आहे. यश मिळो किंवा अपयश त्याला काहीच फरक पडत नाही. त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट समानच आहे. तसंही ना अक्षय आणि ना आदित्य धर कोणालाच सिनेमाच्या यशाचं श्रेय घेण्यात रस नाही."
'धुरंधर'ने जगभरात ७०० कोटी पार गल्ला जमवला आहे. तर भारतात सिनेमात ५०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेणार आहे. गेल्या १५ दिवसात सिनेमाच्या कमाईत दिवसेंदिवस वाढच होत आहे. आता या वीकेंडला सिनेमा किती कमावतो याकडे सर्वांचं लक्ष आहे. पुढील वर्षी १९ मार्च रोजी सिनेमाचा दुसरा पार्ट रिलीज होणार आहे.