भयंकर प्रकार! 'द राजा साब'च्या स्क्रीनिंगदरम्यान प्रभासच्या चाहत्यांनी कागदाचे तुकडे जाळले, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 08:47 IST2026-01-10T08:46:43+5:302026-01-10T08:47:33+5:30
थिएटरमधील भयानक प्रकार समोर आला असून प्रभासच्या अतिउत्साही चाहत्यांनी कागदाचे तुकडे पेटवले आहेत. त्यामुळे थिएटरमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते

भयंकर प्रकार! 'द राजा साब'च्या स्क्रीनिंगदरम्यान प्रभासच्या चाहत्यांनी कागदाचे तुकडे जाळले, व्हिडीओ व्हायरल
ओडिशामधील एका चित्रपटगृहात प्रभासच्या 'द राजा साब' (The Raja Saab) चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशामधील रायगडा जिल्ह्यातील अशोक थिएटरमध्ये 'द राजा साब'चा शो सुरू असताना हा धक्कादायक प्रकार घडला.
प्रभासचा चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या काही अतिउत्साही चाहत्यांनी स्क्रीनसमोर मोठ्या प्रमाणात सजावटीचे कागदी तुकडे उधळले. मात्र, केवळ जल्लोष करून न थांबता, या चाहत्यांनी चक्क त्या कागदांच्या ढिगाऱ्याला आग लावली. क्षणार्धात स्क्रीनसमोर आगीचे लोट दिसू लागले, ज्यामुळे चित्रपटगृहात एकच खळबळ उडाली आणि प्रेक्षकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
सुदैवाने, तिथे उपस्थित असलेल्या काही सतर्क चाहत्यांनी आणि थिएटर कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेऊन ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. जर ही आग वेळीच विझवली गेली नसती, तर चित्रपटगृहातील पडदा किंवा इतर साहित्याला आग लागून मोठा अनर्थ घडू शकला असता. या घटनेमुळे चित्रपटगृहाच्या मालमत्तेचे नुकसान होण्याची आणि प्रेक्षकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी या चाहत्यांच्या उत्साही स्वभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एका युजरने संताप व्यक्त करत म्हटले की, "हे तुमचं घर नाही, हे सार्वजनिक ठिकाण आहे. अशा कृत्यांमुळे तुम्ही प्रभासचे नाव खराब करत आहात." दुसऱ्या एका युजरने अशा 'वेड्या' चाहत्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रभासचा 'द राजा साब' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करत असला, तरी अशा प्रकारच्या घटनांमुळे चित्रपटाला वादाचा सामना करावा लागत आहे.