"इतकं टॉर्चर केलं की..."; कपिल शर्माचा शो सोडल्यावर उपासना सिंग यांनी पहिल्यांदाच सोडलं मौन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 17:31 IST2025-01-02T17:16:36+5:302025-01-02T17:31:06+5:30
Upasana Singh : कपिल शर्माचा शो 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'मध्ये पिंकी बुवाची भूमिका साकारून अभिनेत्री उपासना सिंगने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं.

कपिल शर्माचा शो 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'मध्ये पिंकी बुवाची भूमिका साकारून अभिनेत्री उपासना सिंगने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं. पण जेव्हा कपिल शर्मा कलर्समधून सोनीमध्ये आला तेव्हा उपासना शोमधून बाहेर पडल्या आणि कृष्णा अभिषेकच्या कॉमेडी शोचा भाग झाल्या.
उपासना यांनी आता वर्षांनंतर कपिल शर्माच्या शोला रामराम का केला याबाबत मौन सोडलं आहे. सिद्धार्थ कन्ननला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उपासना यांनी कपिल शर्मा आणि कृष्णा अभिषेक यांच्यातील वादात अडकल्याचा खुलासा केला आहे.
"आमचा शो २८ वर्षे पहिल्या क्रमांकावर राहिला आणि फार कमी लोकांनी असा शो दिला. एक वेळ अशी आली की, माझ्याकडे करण्यासाठी काहीच नव्हतं. मी कपिलला असंही सांगितलं होतं, माझे त्याच्यासोबत खूप चांगले संबंध आहेत, भांडण नाही, भांडणामुळे मी शो सोडला असं अनेक जण म्हणतात."
"मी कपिलला सांगितलं की, हा शो आधी होता तसा आता राहिला नाही, मला पूर्वी तो शो करायला मजा यायची. तर कधी कधी मी फक्त दोन ओळी बोलायचे. त्यामुळे मी कपिलला माझ्या व्यक्तिरेखेकडे लक्ष देण्यास सांगितलं होतं. तेव्हा तो त्याच्या चित्रपटासाठी काम करत होता."
"यातून बाहेर पडता आलं तर मी करेन असं तो मला सांगायचा. मधल्या काळात कलर्सचा कपिलशी काही वाद झाला आणि माझं कॉन्ट्रॅक्ट कलर्ससोबत झालं होतं. माझं कपिल किंवा त्याच्या टीमसोबत कोणतंही कॉन्ट्रॅक्ट झालेलं नाही."
"जेव्हा हे लोक सोनीवर आले, तेव्हा कलर्स म्हणालं की, आमचं तुझ्याशी कॉन्ट्रॅक्ट आहे. ते कृष्णाचा शो आणत होते, म्हणून कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होईपर्यंत तुम्ही ते करा असं सांगितलं. या दोन वेगवेगळ्या टीम असल्याने मी कम्फर्टेबल नव्हते."
"कपिल आणि कृष्णाच्या टीममध्ये काहीसा तणाव होता. मी जेव्हा यायचे तेव्हा ते बोलणं बंद करायचे, माझी काही पंचलाईन असेल तर बरेच लोक ती कट करायचे. मला कोणाचंही नाव घ्यायचं नाही. त्यानंतर वाद झाला आणि मी शो सोडला."
"इतकं टॉर्चर केलं की, या पंचलाईनवर लोक हसतील हे माहीत असतानाही, टेलिकास्टमध्ये ती लाइन कापायचे. अशा अनेक गोष्टी घडल्या आणि कपिलने मला त्याच्या शोमध्ये येण्यास सांगितलं. पण त्यानंतर निर्माती म्हणून मी दोन पंजाबी चित्रपट सुरू केले होते."
"कपिलने एका चित्रपटातही व्हॉईस ओव्हर केला होता, आमचं खूप चांगलं नातं आहे. अनेक गोष्टी घडल्या पण मी कामात समाधानी नव्हते, म्हणून मी म्हणाले की, मला हा शो करायचा नाही" असं उपासना सिंग यांनी म्हटलं आहे.