Tunisha Sharma : वडिलांच्या मृत्यूचा धक्का, ब्रेकअप, डिप्रेशन... कोणत्या तणावात होती तुनिशा; मित्राचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 17:45 IST2022-12-26T17:03:58+5:302022-12-26T17:45:29+5:30

Tunisha Sharma : 20 वर्षीय तुनिशाच्या आत्महत्येने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. याच दरम्यान तिचा जवळचा मित्र कंवर ढिल्लन यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माने (Tunisha Sharma) शूटिंग सेटवरच गळफास लावून आत्महत्या केल्याने टेलिव्हिजन क्षेत्रात खळबळ माजली आहे. काही तासांपूर्वी सीनसाठी तयार होत असतानाचा व्हिडीओ तुनिशाने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. तुनिशच्या आईने अभिनेता शिझान खानवर (Sheezan Khan) गंभीर आरोप केले आहे.

शिझानला कंटाळून तुनिषाने आत्महत्या केल्याचा आरोप तुनिशाच्या आईने केला आहे. आईच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. वसई विभागाचे सहाय्यक पोलीस उपायुक्त चंद्रकांत जाधव यांनी सांगितले, "तुनिशा शर्माने शूटिंग दरम्यान सेटवर आत्महत्या केली आहे."

"आत्महत्येचा एडीआर फॉर्म भरुन तिच्या आईच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्याची कारवाई करत आहोत. सहकलाकार शिझान खानसोबत तिचे संबंध होते. यातुनच ती नैराश्यात होती आणि तिने हे टोकाचे पाऊल उचललं. आईच्या फिर्यादीवरुन कारवाई सुरू केली आहे."

तुनिशा शनिवारी तिच्या 'अली बाबा: दास्तान-ए-काबुल' या मालिकेच्या शूटिंगसाठी नायगाव येथील सेटवर पोहोचली. तुनिशाचा को-स्टार शिझानच्या म्हणण्यानुसार, तो दुपारी 3 वाजता त्याच्या मेकअप रूमजवळ पोहचला. तेव्हा रुमचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ दार न उघडल्याने त्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. आत तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

20 वर्षीय तुनिशाच्या आत्महत्येने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. याच दरम्यान तिचा जवळचा मित्र कंवर ढिल्लन यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्याने तुनिशा मेडिटेशनवर असून तिला एंग्जाइटी इश्यू असल्याचं सांगितलं आहे. ई-टाइम्ससोबत संवाद साधताना त्याने हा खुलासा केला आहे.

"कोरोनामध्ये तुनिशाची आई चंदीगडमध्ये अडकली होती. तेव्हा ती मित्राच्याच घरी राहिली. तो गेल्या कित्येक दिवसापासून एंग्जाइटी आणि डिप्रेशनमध्ये होती. मी तिला यामध्ये मदत करत होतो. आता तुनिशाच्या जाण्याने तिची आई एकटी पडली आहे. त्यांची अवस्था पाहवत नाही. हे सर्व खूप अवघड आहे."

"तुनिशा आणि मी मुंबईत करियर करण्यासाठी एकत्र आलो होतो. करियर ही खूप पुढची गोष्ट आहे. तिला प्रेम हवं होतं. वडिलांच्या निधनानंतर ती खूप अवघ़ड आयुष्य जगत होती. तिच्या आईने तिला एकटीने वाढवलं. त्यांनी अनेक अडचणींचा सामना केला. खूप वर्षांआधी तिच्या वडिलांचा मृत्यू झाला."

"तुनिशा एकुलती एक मुलगी होती. तिने आणि तिच्या आईने आयुष्यात खूप चढ-उतार पाहिले, गेल्या वर्षभरात तिने खूप काम केलं, त्यामुळे तिच्यावर किती प्रेशर असेल हे समजू शकतं" असं कंवर ढिल्लन यांनी म्हटलं आहे. तसेच मित्राने तिच्या शेवटच्या इन्स्टा पोस्टचाही उल्लेख केला आहे.

तुनिशा किती त्रास होत होता हे तिच्या पोस्टवरून दिसून येतं. तिच्यावर उपचार सुरू असल्याचं देखील मित्राने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 15 दिवसांपूर्वी ब्रेकअप झाले होते. आपल्या मृत्यूच्या एक दिवस आधी तुनिशाने तिच्या आईशी झालेल्या संवादात शिझानबद्दल तिची तळमळ व्यक्त केली होती.

एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार, मला शिझान हवाय. आई मला तुला माझ्या मनातली गोष्ट सांगायची आहे. मला तो माझ्या आयुष्यात परत हवा आहे, पण तो ऐकायला तयार नाही, तू बोलशील का एकदा शिझानशी. यानंतर तुनिशाची आई शिझानशी बोलली होती आणि तुनिशाच्या आयुष्यात परत येण्यास देखील सांगितलं होतं. पण शिझानने स्पष्ट शब्दात नकार दिला होता.

तुनिशाच्या आईने सांगितले, ती याबाबत शिझानच्या आईशीही बोलली होती आणि की जर त्याला तुनिशासोबत असंच वागायचं होतं तर तो तिच्या आयुष्यात का आला? तेव्हा शिझानची आई तुनिशाच्या आईला म्हणाली, यात मी काय बोलू? दोघांनीही एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. आता काय झाले ते फक्त शिझानच सांगू शकेल.

तुनिशाच्या आईने शिझानशी अनेकवेळा संपर्क साधला होता आपल्या मुलीला असं फसवायचंच होतं मग तू तिच्या जवळ आलाच कशाला? माझ्या मुलीचं आयुष्य का उद्ध्वस्त केलंस? असा जाब शिझानला विचारला होता, असंही तुनिशाच्या आईनं सांगितलं. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.