"नाव ऐकताच कामावरुन काढून टाकायचे"; कोट्यधीश घराण्यातील गायक पण आडनावामुळे रिजेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 11:25 IST2026-02-02T11:06:00+5:302026-02-02T11:25:58+5:30

आडनावामुळे अनेकदा अडचणी आणि रिजेक्शनचा सामना करावा लागला होता.

अमाल मलिक हे संगीत क्षेत्रातील एक नामांकित नाव आहे. 'बिग बॉस १९' मुळे त्याला घराघरात एक वेगळी ओळख मिळाली. या शोमध्ये अमाल अनेकदा आपल्या संघर्षाबद्दल बोलताना दिसायचा.

अमालने आता पुन्हा एकदा खुलासा केला आहे की, त्याच्या आडनावामुळे त्याला अनेकदा अडचणी आणि रिजेक्शनचा सामना करावा लागला होता.

आपल्या कठीण दिवसांच्या आठवणींना उजाळा देताना अमाल मलिकने सांगितलं की, संगीत क्षेत्रातील पार्श्वभूमी असूनही त्याला प्रचंड संघर्ष करावा लागला. सुरुवातीच्या काळात चित्रपटसृष्टीत त्याचे स्वागत तसं झालं नाही, जसं त्याला अपेक्षित होते.

'पिंकविला'शी संवाद साधताना अमालने आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला की, 'मलिक' या आडनावाने त्याच्या फायद्याऐवजी नुकसानच जास्त केलं आहे.

अमाल म्हणाला, "मी साहाय्यक (Assistant) म्हणून जिथे कुठे कामाला जायचो, तिथे लोकांना माझं आडनाव 'मलिक' असल्याचं समजताच ते मला कामावरून काढून टाकायचे. ते म्हणायचे- 'अरे, हा तर त्या कुटुंबातला आहे, हा आमचे संगीत बाहेर लीक करू शकतो.' त्या काळात लोकांच्या मनात अशी धारणा बनली होती."

अमालने पुढे सांगितलं की, या भेदभावाचा परिणाम त्याच्या भावावरही झाला. तो म्हणाला, "या गोष्टीचा माझ्या आणि माझा भाऊ अरमान मलिक या दोघांच्याही करिअरवर नकारात्मक परिणाम झाला."

अमालच्या मते, इंडस्ट्रीमध्ये घराण्यांच्या वारशाबाबत असलेल्या गैरसमजांमुळे अनेकदा व्यक्तीची मेहनत आणि क्षमता याकडे दुर्लक्ष केलं जातं. वयाच्या १५ ते २५ या दरम्यानचा काळ त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता.

"त्या १० वर्षांत मी जे काही अनुभवलं, ते कदाचित लोक आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अनुभवतात. पण माझ्यासाठी ते चांगलंच ठरलं, कारण सर्व संघर्ष, अडचणी आणि अडथळे मी माझ्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळातच अनुभवले आहेत."

अमाल म्हणाला की, इतक्या अडचणी असूनही त्याने हार मानली नाही. उलट या सुरुवातीच्या संघर्षाने त्याला मानसिकदृष्ट्या अधिक खंबीर बनवलं आणि जीवनाकडे पाहण्याचा एक योग्य दृष्टिकोन दिला.

अमालने हे देखील स्पष्ट केलं की, संगीत क्षेत्रातील वारसा असूनही त्याला कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळाली नाही. त्याने साहाय्यक म्हणून काम केलं. इतकंच नाही तर केवळ पैसे कमावण्यासाठी आणि इंडस्ट्रीशी जोडले राहण्यासाठी तो पोस्ट प्रोडक्शनच्या कामासाठी हार्ड डिस्क नेण्याचं कामही करायचा.