शूटिंग सुरू असतानाच रामायणच्या सेटवर आलेला साप, जीव मुठीत घेऊन पळालेले कलाकार; नेमकं काय घडलं होतं?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 12:07 PM2024-01-21T12:07:44+5:302024-01-21T12:32:04+5:30

झाडावर साप अन् त्याखाली शूटिंग करत होते राम, लक्ष्मण, सीता; 'रामायण'च्या सेटवर घडलेला हा प्रसंग माहितीये का?

९०च्या दशकात प्रसारित झालेल्या 'रामायण' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. आजही ही मालिका तितकीच लोकप्रिय आहे.

या मालिकेत अरुण गोविल यांनी श्री राम तर दीपिका चिखलिया यांनी सीता मातेची भूमिका साकारली होती. सुनील लहरी लक्ष्मणाच्या भूमिकेत होते. आजही ते लोकांच्या मनात राम, सीता आणि लक्ष्मणाच्या छबीतच आहेत.

रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेचे अनेक किस्से सांगितले जातात. पण, 'रामायण' मालिकेच्या शूटिंगदरम्यानच असा एक प्रसंग घडला होता. ज्यामुळे कलाकारांना जीव मुठीत घेऊन सेटवरुन पळ काढावा लागला होता.

दीपिका चिखलिया यांनी पोस्टद्वारे हा प्रसंग सांगितला होता. दीपिका यांनी रामायणाच्या सेटवरील एक फोटो शेअर केला होता. यामध्ये ते तिघे एका झाडाच्या खाली शूट करत होते.

"या फोटोच्या मागे एक स्टोरी आहे. म्हणून मी हा फोटो शेअर केला आहे. आम्ही शूटिंगमध्ये व्यग्र होतो. सीन संपल्यानंतर आम्हाला कॅमेरामॅन अजीत नाईक यांनी झाडाखाली उभं न राहण्यास सांगितलं."

"त्यांनी सेटवरुन सगळ्यांना त्या जागेवरून दूर जाण्यास सांगितलं. आम्हाला कळतच नव्हतं काय चाललंय. रामानंद सागरही हाच विचार करत होते."

"त्यानंतर त्यांनी झाडावर असलेल्या सापाकडे बोट दाखवलं. त्यानंतर आम्ही सगळ्यांनीच तिथून पळ काढला," असं त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं होतं. पण, दीपिका यांनी ही पोस्ट नंतर डिलीटही केली होती.

२२ जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अरुण गोविल, दीपिका चिखलिया आणि सुनील लहरी हजेरी लावणार आहेत.