'तो' बॅकलेस ब्लाऊजमधला फोटो अन् ट्रोलिंग, स्पृहा जोशीने आता दिलं सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 10:38 AM2024-01-20T10:38:31+5:302024-01-20T11:36:14+5:30

स्पृहाने दिलेलं उत्तर ऐकून तुम्हाला काय वाटतं

अभिनेत्री, कवयित्री, सूत्रसंचालिका अशा सर्वच भूमिका उत्तम पार पाडणारी कलाकार म्हणजे स्पृहा जोशी (Spruha Joshi). आपल्या बोलण्यातून समोरच्याला मंत्रमुग्ध करण्याची कला तिच्याकडे आहे.

स्पृहाने आतापर्यंत नाटक, मालिका, सिनेमा, वेबसीरिज अशा सर्वच क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे. कोणत्याही भूमिकेत स्पृहा अगदी उठून दिसते. स्पृहाने 'उंच माझा झोका' मालिकेत साकारलेली रमाबाई रानडेंची भूमिका प्रत्येकाच्याच लक्षात राहिली.

नेहमी आपलं काम चोख करणारी स्पृहा इतर वेळी वादविवादांपासून म्हणजेच कॉन्ट्रोव्हर्सीपासून दूरच असते. मात्र काही वर्षांपू्र्वी तिच्या एका फोटोची चांगलीच चर्चा झाली होती. त्या फोटोमुळे तिचे काही चाहतेही नाराज झाले होते.

प़डद्यावर सरळ, साध्या आणि सोज्वळ भूमिकेत दिसणाऱ्या स्पृहाने सहा वर्षांपूर्वी एक फोटो पोस्ट केला. यामध्ये तिने बॅकलेस ब्लाऊज घातला होता. साईड अँगलने हा फोटो क्लिक करण्यात आला होता. नेटकऱ्यांना हा फोटो अगदीच रिव्हिलींग वाटला आणि तिला ट्रोल करायला सुरुवात झाली.

नुकतंच स्पृहाने अनेक वर्षांनी त्या फोटोवरुन स्पष्टीकरण दिलं आहे. 'आरपार' चॅननला दिलेली तिची मुलाखत व्हायरल होत आहे. यामध्ये तिने त्या सर्व कॉन्ट्रोव्हर्सीवर स्पष्ट मत व्यक्त केलंय.

स्पृहा म्हणाली,'मुळात फोटोशूट करताना त्यात फार काही रिव्हिलींग आहे असं नव्हतंच. तो एक हॉल्टर नेक ब्लाऊज होता. ही फार जुनीही गोष्ट नाही सहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे असंही नाहीए की आपण आसपास हॉल्टर नेक ब्लाऊज घातलेले लोकच बघितले नसतील.'

ती पुढे म्हणाली,'आणखी एक गोष्ट प्रेक्षकांनी समजून घेणं फार महत्वाचं आहे की एका पद्धतीची भूमिका एक व्यक्ती करते म्हणजे ती खऱ्या आयुष्यात तशीच असते असं नसतं. किंवा ती तशी असण्याचा अट्टहास करणंही योग्य नाही. नाहीतर मला कामच करता येणार नाही.'

'सतत मला अठराशेच्या शतकातल्या भूमिका कोणीच देणार नाहीत. तसे प्रोजेक्ट्सही बनणार नाहीत. मी सतत तशा भूमिका करत राहिले तर लोक त्यालाही कंटाळतील आणि मी स्वत:ही कंटाळेल. अभिनय क्षेत्रात वेगवेगळ्या भूमिका साकारण्यासाठीच तर आपण येतो.

स्पृहाच्या या उत्तरानंतर तिच्या चाहत्यांनी तिची बाजू घेतली आहे. तू आहेस तशीच आम्हाला आवडतेस. मग तू कशी दिसत असलीस काय घातलं आहेस याचा फरकच पडत नाही अशा कमेंट्स तिच्या प्रतिक्रियेवर आल्या आहेत.