हैदराबादमध्ये झाले विजय-रश्मिकाचं शाही रिसेप्शन! साऊथ ते बॉलिवूड स्टार्स अन् राजकारण्यांची मांदियाळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 12:32 IST2026-03-05T12:02:54+5:302026-03-05T12:32:46+5:30
हैदराबादच्या 'ताज कृष्णा' हॉटेलमध्ये हे भव्य रिसेप्शन झालं. या नवीन जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी साऊथ ते बॉलिवूड स्टार्सपासून राजकारण्यांची मांदियाळी पाहायला मिळाली.

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वात लोकप्रिय कपल म्हणजेच विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना. उदयपूरमध्ये २६ फेब्रुवारीला गुपचूप लग्नगाठ बांधल्यानंतर, या जोडीने बुधवारी रात्री एका भव्य रिसेप्शनचे (Wedding Reception) आयोजन केले होते.

हैदराबादच्या 'ताज कृष्णा' हॉटेलमध्ये हे भव्य रिसेप्शन झालं. या नवीन जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी साऊथ ते बॉलिवूड स्टार्सपासून राजकारण्यांची मांदियाळी पाहायला मिळाली.

खास उपस्थिती ठरली ती म्हणजे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री म्हणून डी.के. शिवकुमार यांची. रश्मिका ही कर्नाटकची असल्यानं त्यांना खास आमंत्रण देण्यात आलं होतं.

तेलंगणा भाजप नेते जी किशन रेड्डी हे देखील विजय आणि रश्मिका यांना सुखी वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले.

तेलंगणा सरकारमधील माजी मंत्री केटी रामा राव हे त्यांच्या पत्नीसह पोहोचले. माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र केटीआर यांनी नवविवाहित जोडप्याला त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या जोडप्याच्या रिसेप्शनमध्ये चिरंजीवी, नागार्जुन, व्यंकटेश, कार्थी यांच्यासह साऊथच्या प्रत्येक मोठ्या स्टारने हजेरी लावली आहे.

विजय-रश्मिकाच्या या भव्य रिसेप्शनमध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन यांनी आपल्या कुटुंबासह उपस्थिती लावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

'पुष्पा' फेम सुपरस्टार अल्लू अर्जुनने आपली लाडकी को-स्टार रश्मिका मंदाना हिच्या लग्नाच्या रिसेप्शनला हजेरी लावून सर्वांच्या नजरा वळवून घेतल्या.

अभिनेता राम चरणदेखील पत्नी उपासनासोबत रिस्पेशनला आला होता. राम चरण सध्या त्यांच्या धार्मिक परंपरेनुसार अयप्पा दीक्षेचे पालन करत असल्यानं तो काळे कपड्यात होता. तसेच अनवाणी होता, त्याच्य पायात साधी चप्पलही नव्हती. अनवाणी पायानेच तो सोहळ्याला फिरताना दिसून आला.

हैदराबादमध्ये झालेल्या या रिसेप्शनला बॉलिवूडमधून लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर, रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा, अभिनेत्री नीना गुप्ता आणि अभिनेत्री क्रिती सनॉन पोहोचले होते.

या रिसेप्शन पार्टीत अभिनेत्री क्रिती सनॉनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 'कॉकटेल २' सिनेमात क्रिती सनॉन आणि रश्मिका या दोघी एकत्र झळकणार आहेत.

विशेष म्हणजे, या रिसेप्शनमध्ये मृणाल ठाकूर हिच्या सौंदर्याने लक्ष वेधून घेतलं. आपल्या साध्या पण अत्यंत मोहक सौंदर्याने मृणालने या सोहळ्याची रंगत अधिकच वाढवली.

विजय आणि रश्मिकाने रिसेप्शनसाठी अत्यंत साध्या आणि पारंपरिक लूकची निवड केली होती. विजय देवरकोंडाने पांढऱ्या रंगाची पारंपारिक वेष्टी आणि कुर्ता परिधान केला होता. तर रश्मिकाने देखील साध्या पण देखण्या साडीत सर्वांची मने जिंकली. लग्नाच्या सहा दिवसांनंतर झालेल्या या सोहळ्याची चर्चा सध्या संपूर्ण देशभरात होत आहे.

















