Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 15:17 IST2025-08-26T15:06:57+5:302025-08-26T15:17:07+5:30
Jasmin Jaffar Guruvayoor Reel: मुस्लीम धर्मीय असलेल्या जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरात एक व्हिडीओ शूट केला. यात ती मंदिर परिसरातील तलावामध्ये पाय बुडवून बसलेली दिसत आहे. त्यावरून आता वादाला तोंड फुटलं आहे.

बिग बॉस फेम युट्यूबर जास्मीन जाफर एका धार्मिक वादात अडकली आहे. जास्मीनच्या मंदिरातील एका व्हिडीओमुळे हा वाद निर्माण झाला आहे. तिचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.
युट्यूबवर जास्मीन जाफर ही केरळमधील गुरूवायूर येथील एका मंदिरात गेली होती. जास्मीनने श्रीकृष्ण मंदिरात जाऊन तिचा एक व्हिडीओ शूट केला. ती मंदिरातील वेगवेगळ्या ठिकाणी गेली.
कृष्ण मंदिराच्या परिसरात एक दगडी तलावही आहे. त्या तलावाच्या काठावर बसून तिने शूट केले. व्हिडीओमध्ये ती तलावात पाय बुडवून पाणी खेळताना दिसत आहे.
जास्मीन जाफर त्यानंतर मंदिरातील इतर ठिकाणी गेली. तिने गजरा घेतला. तिच्या हातात पोरपंखही होते. मंदिर परिसरात तिने शूट केलेल्या व्हिडीओवरून सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.
जास्मीनने तलावामध्ये पाय बुडवल्याचा मुद्दा चिघळल्यानंतर मंदिर प्रशासनाने तलावाचे शुद्धीकरण केले. तलावात पाय बुडवण्यावर बंदी आहे. प्रशासनाने या प्रकरणी जास्मीन विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
मंदिर प्रशासनाचे म्हणणे आहे की, हा तलाव पवित्र मानला जातो. या तलावातून देवांच्या स्नानासाठी पाणि नेले जाते, त्यामुळे त्यात उतरण्यास बंदी आहे. मात्र, जास्मीनने नियमांचं उल्लंघन करून व्हिडीओ बनवला आहे.
सोशल मीडियावर प्रचंड टीका सुरू झाल्यानंतर जास्मीन जाफरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत माफी मागितली आहे. जे लोक माझ्यावर प्रेम करतात आणि इतरही ज्यांच्या भावना माझ्या व्हिडीओमुळे दुखावल्या गेल्या, त्यांची मी माफी मागते, असे ती म्हणाली.
कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा उद्देश नव्हता किंवा मला वादही निर्माण करायचा नव्हता. अनपेपक्षितपणे माझ्याकडून ही चूक झाली आहे आणि या चुकीबद्दल मी मनापासून सगळ्याची माफी मागते, असेही जास्मीन जाफरने म्हटले आहे.