शिवरायांच्या भूमिकेसाठी ३ महिन्यात १७ किलो वजन कसं कमी केलं? सिद्धार्थ बोडके म्हणाला- "दररोज दोन वेळा..."

By देवेंद्र जाधव | Updated: November 3, 2025 12:58 IST2025-11-03T12:41:15+5:302025-11-03T12:58:03+5:30

पुन्हा शिवाजीराजे भोसले सिनेमातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी सिद्धार्थने अवघ्या तीन महिन्यात १७ किलो वजन कमी कसं केलं, याचा खुलासा त्याने केलाय

सध्या सिद्धार्थ बोडकेची प्रमुख भूमिका असलेल्या 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. या सिनेमात सिद्धार्थने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे

सिद्धार्थने या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या सांगण्यानुसार महाराजांसारखं दिसणं महत्वाचं होतं. त्यामुळे सिद्धार्थने स्वतःच्या शरीरयष्टीवर काम केलं.

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थने हा अनुभव सांगितला. सिद्धार्थने एका सिनेमासाठी वजन वाढवलं होतं. पण तो सिनेमा बंद पडला. सिद्धार्थचं वजन मात्र वाढलं होतं.

त्यानंतर 'देवमाणूस' सिनेमाची सिद्धार्थला ऑफर मिळाली. त्या सिनेमात भूमिकेची गरज म्हणून सिद्धार्थने स्वतःचं वजन आणखी वाढवलं.

'देवमाणूस'च्या आधी महेश मांजरेकरांनी त्याला छत्रपती शिवरायांच्या भूमिकेबद्दल सांगितलं होतं. त्यांना महाराजांची पिळदार शरीरयष्टी अपेक्षित होती.

त्यामुळे जवळपास तीन महिने सिद्धार्थ दिवसातून दोन वेळेला व्यायाम करायचा. शैलेंद्र राणे आणि ट्रेनर कार्तिक या दोघांनी मिळून सिद्धार्थचा फिटनेस आणि डाएटवर खूप मेहनत घेतली.

कमी दिवसात स्वतःमध्ये बदल घडवणं सिद्धार्थला आवश्यक होतं. सिद्धार्थचं वजन ८८ किलोवरुन ७१ किलो झालं. एकूण १७ किलो वजन सिद्धार्थने घटवलं. फक्त वजन कमी करणंच नव्हे तर पिळदार शरीरही त्याने बनवलं. त्याच्यासाठी हे मोठं आव्हान होतं.