पहिलं लग्न मोडलं, मग थाटला दुसरा संसार, हटके आहे रेणुका शहाणे आणि आशुतोष राणांची प्यारवाली लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 06:52 PM2023-03-27T18:52:32+5:302023-03-27T18:56:41+5:30

Renuka Shahane Birthday: आज २७ मार्च रोजी रेणुका शहाणे यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांची लव्हस्टोरी...

बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल्सपैकी एक कपल म्हणजे अभिनेते आशुतोष राणा(ashutosh rana) आणि अभिनेत्री रेणुका शहाणे (renuka shahane). आशुतोष आणि रेणुका यांनी २००१ साली लग्नगाठ बांधली. मात्र लग्नाच्या २० वर्षांनंतरही हे कपल एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करताना दिसतात.

आशुतोष आणि रेणुका यांची भेट हंसल मेहता यांच्या '... जयते' चित्रपटाच्या सेटवर झाली. आशुतोष रेणुकाला एक अभिनेत्री म्हणून ओळखत होते. मात्र रेणुकाला त्यांच्याबद्दल काहीही ठाऊक नव्हते.

पहिल्याच दिवशी त्या दोघांनी तीस मिनिटे गप्पा मारल्या आणि या गप्पांदरम्यानच आशुतोष रेणुकाच्या प्रेमात पडले. रेणुकाच्या बोलण्याची पद्धत त्यांना भावली. त्यानंतर ते तिच्याशी बोलण्याची संधी शोधू लागले.

पुढे दसऱ्याला रेणुकाला शुभेच्छा द्यायला त्यांनी तिला फोन केला आणि तिथून त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली. रेणुकाने आशुतोष यांना तिचा पर्सनल नंबर दिला होता त्यामुळे त्यांचे दररोज फोनवर बोलणे होत असे. त्यानंतर तीन महिन्यांनी आशुतोष यांनी रेणुकाला प्रपोज करायचे ठरवले.

आशुतोष यांनी फोनवर एक कविता ऐकवत रेणुकाला प्रपोज केले. त्यानंतर क्षणाचाही वेळ न दवडता रेणुकाने त्यांना होकार दिला.

तीन वर्षांनंतर त्यांनी रेणुकाला लग्नाबद्दल विचारलं. मात्र आशुतोष गावाकडचे असल्याने आणि त्यांचे कुटुंब मोठे असल्याने रेणुकाला थोडी भीती वाटत होती.

तसेच रेणुका घटस्फोटित होती. रेणुकाचा मराठी अभिनेते विजय केंकरे यांच्यासोबत घटस्फोट झाला होता. मात्र या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आशुतोष यांनी रेणुकासोबत लग्नगाठ बांधली. आता त्यांचा सुखाचा संसार सुरू आहे.

रेणुका आणि आशुतोष यांना शौर्यमन आणि सत्येंद्र अशी दोन मुलं देखील आहे.