मार्शल आर्ट किंग ब्रूस ली च्या मृत्यूचं रहस्य उलगडलं, रिसर्चमधून करण्यात आला मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 01:55 PM2022-11-23T13:55:38+5:302022-11-23T14:02:23+5:30

Bruce Lee : आजपर्यंत ब्रूस ली च्या मृत्यूचं कारण कुणाला समजलं नव्हतं. पण आता ते समोर आलं आहे.

जगात क्वचितच कुणी अशी व्यक्ती असेल जी “ब्रूस ली”ला ओळखत नसेल. 90च्या दशकात त्याने अनेक हिट सिनेमे दिले. तो मार्शल आर्ट किंग म्हणून ओळखला जात होता. पण वयाच्या 32 व्या वर्षी अचानक त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूबाबत अनेक शंका व्यक्त करण्यात आल्या. आजपर्यंत त्याच्या मृत्यूचं कारण कुणाला समजलं नव्हतं. पण आता ते समोर आलं आहे.

आजपासून 49 वर्षाआधी ब्रूस ली चा मृत्यू तेव्हा झाला जेव्हा तो करिअरच्या शिखरावर होता. मृत्यूवेळी तो त्याचं कुंग फू स्कूल आणि शूटिंगमध्ये व्यस्त होता. 1973 मध्ये जेव्हा त्याचा मृत्यू झाला तेव्हा तो ना आजारी होता ना त्याला काही समस्या होती. अचानक त्याची तब्येत बिघडली आणि काही सेकंदात त्याने आपल्या फॅन्सना अलविदा म्हटलं.

त्याच्या मृत्यूबाबत अनेक कथा सांगितल्या जातात. काही लोक सांगतात की, ब्रूस ली ची हत्या चीनच्या गॅंगस्टर्सने केली होती, तर काही मानतात की, त्याची हत्या त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने केली. असं सांगितलं जातं की, त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने त्याला विष दिलं होतं. पण इतक्या वर्षानंतर त्याच्या मृत्यूचं रहस्य समोर आलं आहे.

एका रिसर्चनुसार वैज्ञानिकांनी हा दावा केला की, ब्रूस ली च्या मृत्यूचं कारण कोणता आजार नाही तर जास्त पाणी पिणं हे होतं. रिसर्चनुसार जास्त प्रमाणात पाणी पिणे, काही औषधं खाणे आणि मद्यसेवन केल्याने त्याचं शरीर हाइपोनेट्रेमियाचं शिकार झालं होतं. हाइपोनेट्रेमियाच्या स्थितीत शरीरात सोडिअमचं प्रमाण वाढल्याने रक्तात याचं प्रमाण असंतुलित झालं होतं.

वैज्ञानिकांनुसार, ब्रूस ली आपल्या डाएटमध्ये जास्त लिक्विड घेत होता आणि त्या लिक्विड डाएट किंवा प्रोटीन डाएटमध्ये तो मारिजुआना म्हणजे गांजा मिक्स करून पित होता. मारिजुआनामुळे त्याची तहान अधिक वाढत होती. ज्यामुळे तो जास्त पाणी पित होता. त्याशिवाय दारू आणि अनेक पेनकिलरचंही सेवन तो करत होता. ज्यामुळे त्याची किडनी डॅमेज झाली होती.

ब्रूस ली त्याच्या डाएटमध्ये जास्त लिक्विड घेत होता याचा उल्लेख त्याच्यावर लिहिणाऱ्या एका पुस्तकात करण्यात आला आहे. त्याच्यावरील या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे की, ज्या दिवशी त्याचा मृत्यू झाला, त्या दिवशी तो पुन्हा पुन्हा पाणी पित होता. सोबतच न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, ब्रूस ली ची पत्नी लिंडा ली कॅडवेल ने तिच्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तो "गाजर आणि सफरचंदचा रस" घेत होता.