Lata Mangeshkar Death Anniversary: “पुन्हा लता मंगेशकर म्हणून जन्म नको...”, असं का बोललेल्या लता दीदी...?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 12:29 PM2023-02-06T12:29:36+5:302023-02-06T12:44:23+5:30

Lata Mangeshkar Death Anniversary: लता मंगेशकर यांच्यासारखा दैवी स्वर घेऊन जन्माला येण्याचं भाग्य कोण नाकारेल? पण लता दीदींना मात्र पुन्हा लता मंगेशकर म्हणून जन्मास यायला नको होतं...

आपल्या सुमधुर गायनाने केवळ देशातीलच नाही, तर जगभरातील श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा आवाज म्हणजे गायिका लता मंगेशकर. एक वर्षापूर्वी आजच्याच दिवशी लतादीदी हे जग सोडून गेल्या.

आज लता मंगेशकर यांचा आज पहिला स्मृतीदिन. ६ फेब्रुवारी २०२२ रोजी लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड गेल्या. दीदी आज आपल्यात नाहीत पण त्यांचे स्वर आणि गाणी आपल्या मनात कायम राहतील.

लता मंगेशकर यांच्यासारखा दैवी स्वर घेऊन जन्माला येण्याचं भाग्य कोण नाकारेल? पण लता दीदींना मात्र पुन्हा लता मंगेशकर म्हणून जन्मास यायला नको होतं.

'मला पुढच्या आयुष्यात लता मंगेशकर व्हायचे नाही...,' हे त्यांचेच शब्द. एका मुलाखतीत त्या स्वत: असं म्हणाल्या होत्या. यामागचं कारणही त्यांनी सांगितलं होतं.

जावेद अख्तर यांनी एकदा लता मंगेशकर यांची मुलाखत घेतली होती. पुढच्या जन्मात तुम्ही काय बनू इच्छिता? असा प्रश्न जावेद अख्तर यांनी दीदींना विचारला होता.

या प्रश्नावर लता दीदींनी हसत हसत उत्तर दिलं होतं. मला याआधीही हा प्रश्न विचारला गेला आहे. मी तेव्हा जे उत्तर दिलं तेच आत्ता देईल, असं त्या म्हणाल्या होत्या.

'पुढचा जन्म मिळाला नाही तर चांगलंच. पुन्हा जन्म मिळाला तर काहीही व्हायला आवडेल पण फक्त लता मंगेशकर म्हणून पुन्हा जन्माला यायचं नाही...', असं त्या म्हणाल्या होत्या.

असं का? असं विचारल्यावर,' लता मंगेशकर की जो तकलीफें हैं, वो बस लता ही जानती है, ' असं त्या म्हणाल्या होत्या. लता दीदींच्या निधनानंतर त्यांच्या मुलाखतीची ही क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती.

लता दीदीनी खूप नाव लौकिक मिळवला. पण या प्रवासात त्यांच्या वाट्याला मोठा संघर्ष आला. वडिलांच्या अकाली निधन झाल्यानंतर आई व चार लहान भावंडांची जबाबदारी दीदींच्या खांद्यावर आली.

दीदींचं बालपण फारच खडतर अवस्थेत गेलं होतं. कुटुंबाच्या जबाबदारीसाठी त्यांना खूप लहान वयात काम सुरू करावं लागलं.

संघर्षाच्या काळात त्या काळात लता मंगेशकर यांना मुंबईत स्टुडिओंमधून पायपीट करावी लागे. प्रवास करण्याएवढेही कधी पैसे नसायचे, तेव्हा चालत जाण्याशिवाय पर्याय नव्हता.

1945 मध्ये लतादीदी मुंबईत आल्या आणि पार्श्वगायनाचं क्षेत्र त्यांच्यापुढे खुलं झालं. मग त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. अक्षरशः हजारो गाणी त्यांनी गायली. हिंदी-मराठीच नव्हे तर 36 भारतीय भाषांतली गाणी लतादीदींनी गायली