माना कादरीच्या आधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता सुनील शेट्टी, 'मध्यरात्री फोन...' वाचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 09:27 AM2023-08-11T09:27:49+5:302023-08-11T09:42:41+5:30

सुनील शेट्टी आज ६२ वा वाढदिवस साजरा करत आहे.

बॉलिवूडचा अण्णा सुनील शेट्टी (Suniel Shetty) आज आपला 62 वा वाढदिवस साजरा करत आहे. सुनील शेट्टीचा वेगळा चाहतावर्ग आहे. 'धडकन' सिनेमातील त्याचा अभिनय आजही प्रेक्षक आवडीने पाहतात. तसंच साठी उलटून गेली तरीही त्याचा फिटनेस वाखणण्याजोगा आहे.

'मोहरा','हेरा फेरी','बॉर्डर' असे अनेक सुपरहिट चित्रपट त्याने दिले आहेत. 'बलवान' या 1992 साली आलेल्या सिनेमातून त्याने पदार्पण केलं. तर 'अन्ना' या सिनेमाने त्याला खरी ओळख दिली. म्हणूनच त्याला बॉलिवूडमध्ये अण्णा म्हटले जाऊ लागले. याशिवाय त्याने हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री घेतली आहे.

सुनील शेट्टीच्या वैयक्तिक आयुष्यातील लव्हस्टोरीही फिल्मीच आहे. त्याने माना शेट्टीशी लग्न केले. मात्र त्यांच्या लग्नाची गोष्ट एखाद्या सिनेमापेक्षा कमी नाही. पण त्याहीआधीची गोष्ट म्हणजे सुनीलला एक बॉलिवूड अभिनेत्री आवडायची.

सुनील शेट्टी खरं तर अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या (Sonali Bendre) प्रेमात होता. ती त्याची क्रश होती. दोघांनी एकत्र सिनेमात कामही केलं आहे. तेव्हा त्यांच्यात मैत्री झाली. त्यांच्या अफेअरच्या चर्चाही होऊ लागल्या होत्या. एकदा तर एका व्यक्तीने मध्यरात्री २ वाजता सोनालीला सुनील शेट्टीचा आवाज काढत फोन केला होता. मी सुनील शेट्टी बोलतोय, 'माझ्यासोबत पळून चल' असं तो म्हणाला होता. यानंतर सोनाली खूप डिस्टर्ब झाली होती.

नंतर सुनीलच्या आयुष्यात माना (Manna Shetty) आली. त्यांची भेट खरंतर एका पेस्ट्री शॉपमध्ये झाली होती. तिला पाहताच तो तिच्या प्रेमात पडला होता. मानाशी बोलायच्या आधी त्याने तिच्या बहिणीशी मैत्री केली. बहिणीमुळे दोघांच्या भेटी वाढल्या आणि ते प्रेमात पडले.

सुनील शेट्टी आणि माना दोघांनी जेव्हा घरी नात्याबद्दल सांगितलं तेव्हा दोघांच्या घरच्यांचा विरोध होता. माना अर्धी पंजाबी आणि मुसलमान होती. तर सुनील शेट्टी कर्नाटकचा तुलू भाषिक आहे. यामुळे दोन्ही कुटुंबांचा विरोध होता. पळून जाऊन लग्न करण्याचाच त्यांच्यासमोर पर्याय होता. मात्र त्यांनी तसं केलं नाही.

कुटुंबाच्या साक्षीनेच लग्न करायचं आणि त्यासाठी वाट पाहायची असं त्यांनी ठरवलं. अखेर ९ वर्ष वाट पाहिल्यानंतर दोघांच्या कुटुंबांनी अखेर होकार दिला. नंतर 25 डिसेंबर 1991 रोजी दोघंही लग्नबंधनात अडकले. काही वर्षात मानाने अथिया आणि अहान यांना जन्म दिला.

मानाचे मुंबईतील वरळीमध्ये इंटिरियर शोरुम आहे. तर सुनील शेट्टीचा अभिनयाव्यतिरिक्त हॉटेल व्यवसायही आहे. खरंतर सुनील शेट्टीमुळेच बॉलिवूड कलाकारांना अभिनयासोबतच व्यवसाय करण्याची कल्पना मिळाली. सुनील शेट्टी किक बॉक्सिंगही चांगली करतो.