'या' दोन चुलत बहिणी एकमेंकीशी बोलत नाहीत, कोण आहेत त्या आणि दुराव्याचं कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 17:15 IST2025-10-16T17:08:58+5:302025-10-16T17:15:34+5:30
इंडस्ट्रीतील 'या' दोन चुलत बहिणी एकमेकींशी का बोलत नाहीत?

फिल्म इंडस्ट्रीत प्रत्येकजण एकमेकांशी कनेक्ट आहे. कुणाचे मैत्रीचे, प्रेमाचे तर कुणाचे शत्रुत्व नाते एकमेकांशी आहे. मात्र काही कुटुंब अशी आहेत, ज्यांचे एकमेकांशी कौटुंबिक संबंध आहेत. या नात्यांविषयी त्यांच्या चाहत्यांना फार काही ठाऊक नाहीये.
असंच एक आश्चर्यकारक नातं दोन प्रसिद्ध टॉप अभिनेत्रींमध्ये आहे. ज्यांच्या अभिनयाची जादू संपूर्ण देशावर चालते, पण वैयक्तिक आयुष्यात त्या एकमेकींशी अजिबात बोलत नाहीत.
एकीचा बॉलिवूडमध्ये तर दुसरीचा साऊथमध्ये दबदबा आहे. त्या आहेत अभिनेत्री विद्या बालन आणि प्रियामणी (Vidya Balan And Priyamani Are Second Cousins).
विद्या बालन आणि प्रियामणी या एकमेकांच्या चुलत बहिणी आहेत. या दोघींच्या वडिलांचे आजोबा भाऊ होते, ज्यामुळे त्या दोघींमध्ये कौटुंबिक नाते आहे.
मात्र, कौटुंबिक नातं असूनही या दोघींमध्ये मोठा दुरावा आहे. 'News18' ला दिलेल्या एका खास मुलाखतीत प्रियामणीने स्वतः या नात्याबद्दल आणि दुराव्याबद्दल खुलासा केला आहे.
प्रियामणीने स्पष्टपणे सांगितले की, तिचे आणि विद्या बालनचे अजिबात बोलणं होत नाही.
प्रियामणी म्हणाली, "जरी आमचं नातं असलं, तरी आमच्यात अजिबात बोलणं होत नाही. मात्र, माझं आणि विद्या बालन यांच्या वडिलांचं चांगलं बोलणं होतं. ते वेळोवेळी माझ्याशी संपर्क साधतात. कधी माझ्याशी बोलणं झालं नाही, तर ते माझ्या वडिलांना फोन करून गप्पा मारतात" असे प्रियामणीने सांगितले.
प्रियामणीने वैयक्तिक दुरावा असला तरी, विद्या बालनच्या कामाचं मनमोकळेपणे कौतुक केलं आहे. ती म्हणाली, "विद्या एक अतिशय उत्तम आणि अद्भुत अभिनेत्री आहे. आमच्यात नेहमी एकमेकांविषयी आदर आणि कौतुकाची भावना असते. मी तर तिच्या कमबॅकची आतुरतेने वाट पाहते आहे. एक प्रेक्षक म्हणून मला ती खूप आवडते".
प्रियामणी लवकरच मनोज वाजपेयीसोबत 'द फॅमिली मॅन'च्या सीझन ३ मध्ये दिसणार आहे. राज आणि डीके यांच्या सुपरहिट मालिकेत तिने 'सुचित्रा' हे पात्र साकारलेले आहे.