बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, चित्रपटाचा पहिला लूक समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 19:12 IST2025-07-31T18:39:58+5:302025-07-31T19:12:02+5:30

बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाचा चित्रपट 'या' तारखेला होणार प्रदर्शित

परखड विचार, बाणेदार नेतृत्व आणि जनतेशी असलेली नाळ यामुळे बाळासाहेब ठाकरे आजही लोकांच्या हृदयात जिवंत आहेत. लोक त्यांना हिंदुहृदयसम्राट म्हणतात. ठाकरे कुटुंब हे महाराष्ट्र राज्यातील सर्वात प्रसिद्ध आणि शक्तिशाली राजकीय कुटुंबांपैकी एक आहे.

महाराष्ट्राचं राजकारण म्हटलं की पहिलं ठाकरे कुटुंबाचं नाव येतंच. पण, आता याच ठाकरे कुटुंबातील एका सदस्याला राजकारणाच्या ऐवजी ग्लॅमरच्या दुनियेने अधिक आकर्षित केलं. तो रुपेरी पडद्यावर आपली वेगळी ओळख निर्माण करण्याच्या तयारीत आहे.

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. ऐश्वर्य फिल्ममेकर अनुराग कश्यप यांच्या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू करतोय.

ऐश्वर्यच्या चित्रपटाचे पहिले वहिले पोस्टर समोर आले आहे. ऐश्वर्य ठाकरे अनुराग कश्यप यांच्या 'नीशांची' या आगामी चित्रपटातून झळकणार आहे.

'नीशांची'या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग कश्यप यांनी केलं असून निर्मिती अजय राय व रंजन सिंह यांनी केली आहे. हा चित्रपट येत्या १९ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

ऐश्वर्य हा स्मिता यांचा मुलगा आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऐश्वर्यचे काका आहेत.

ऐश्वर्यने इन्स्टाग्राम प्रोफाइलवर आई स्मिता ठाकरे, तसंच आजोबा बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचेही काही फोटो शेअर केलेले आहेत.

ऐश्वर्यच्या बॉलिवूड कारकिर्दीविषयी सांगायचे झाल्यास, त्याने २०१५ साली आलेल्या संजय लीला भन्साळी यांच्या 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले होते.

आता बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्यचा हा पहिला सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरतो की फ्लॉप हे काही दिवसांमध्येच स्पष्ट होईल.