"मुव्ही हिट झाल्यावर 'खरा आनंद' किती जणांना होतो माहित नाही, बॉलिवूडमध्ये एकी असती तर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2024 06:11 PM2024-04-07T18:11:19+5:302024-04-07T18:50:53+5:30

अभिनेत्री क्रिती सेनॉन हिने मुलाखतीत बोलताना बॉलिवूडबद्दल मांडलं रोखठोक मत

Kriti Sanon on Bollywood: अभिनेत्री क्रिती सेनॉन सध्या 'क्रू' (CREW) या तिच्या नव्या चित्रपटाचे यश अनुभवत आहे. क्रितीचा हा चित्रपट 29 मार्चला रिलीज झाल्यापासून दमदार कमाई करत आहे.

क्रितीसोबतच करीना कपूर आणि तब्बू यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने रविवारी बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा पार केला आणि बॉलिवूडच्या मानाच्या '100 Cr Club' मध्ये स्थान मिळवलं.

रिहा कपूरची निर्मिती आणि राजेश क्रिष्णनचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाच्या यशाबद्दल बॉलिवूडमधून क्रिती, करीना आणि तबू यांच्या अभिनयाचे व भूमिकेचे कौतुक केले जात आहे.

बॉलिवूडमधील क्रितीचे सहकारी आणि मित्रमंडळी जरी तिचे व चित्रपटाचे कौतुक करत असले तरीही एका ताज्या मुलाखतीत क्रितीने बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दल काही धक्कादायक विधाने केली आहेत.

"बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एकाने दुसऱ्याला मनापासून पाठिंबा दिला, एकमेकांचे हितचिंतक झाले, अडल्या-नडलेल्यांना वेळोवेळी आधार दिला तर बॉलिवूडची परिस्थिती आतापेक्षा खूप चांगली आणि वेगळी होऊ शकेल."

"पण सध्या लोक केवळ तोंडदेखले कौतुक करतात, टाळ्या वाजवतात... खरंच गरज असताना सपोर्ट मिळेलच याची कुणालाही खात्री देता येऊ शकत नाही. गोष्टी केवळ दिखाव्यापुरत्या केल्या जातात."

"बॉलिवूडमधील मंडळींनी जर एकी ठेवली असती आणि एकमेकांना पाठिंबा देऊन मदत केली असती तर आज बॉलिवूड कुठच्या कुठे पोहोचलं असतं. पण सध्या जे सुरु आहे ते केवळ दाखवण्यापुरतं आहे."

"बॉलिवूडमध्ये मला अजिबात एकी दिसत नाही. एखादा चित्रपट सुपरहिट झाल्यावर किती जणांना मनापासून आनंद होतो याची मला शंकाच वाटते. पण आता हळूहळू चित्र बदलतंय अशी मला आशा आहे," असेही क्रिती म्हणाली.