पत्नीच्या निधनानंतर कोसळले होते जय मेहता, अशी झाली जुही चावलाची एंट्री; 'फिल्मी' आहे लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 04:00 PM2023-03-26T16:00:18+5:302023-03-26T16:18:20+5:30

पैशांसाठी म्हाताऱ्यासोबत लग्न केलं अशी टीकाही अभिनेत्रीवर झाली होती.

बॉलिवू़डची 'चुलबुली गर्ल' जुही चावला (Juhi Chawla) अशी अभिनेत्री आहे जिने नेहमीच आपलं वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्य वेगवेगळं ठेवलं आहे. ९० च्या दशकात जुही आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होती. शाहरुख खान आणि आमिर खानसोबत तिची जोडी प्रचंड गाजली.

१९९५ मध्ये जुही उद्योगपती जय मेहता (Jay Mehta) यांच्यासोबत लग्नबंधनात अडकली. यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. यानंतर ती लाईमलाईटपासून दूरच राहिली. त्यांची लव्ह स्टोरी खूपच फिल्मी आहे.

जुहीचे पती जय मेहता यांचं हे दुसरं लग्न. जुही तेव्हा करिअरच्या उच्च शिखरावर होती. तिने बराच काळ लग्न लपवून ठेवले होते. यामागे नेमकं काय कारण होतं याचा खुलासा जुहीने केला आहे.

जुहीने ७ वर्ष मोठ्या जय मेहता यांच्याशी लग्न केले. फिल्मी अंदाजातच त्यांचे लग्न झाले होते. जुही जेव्हा पहिल्यांदा जय मेहता यांना भेटली तेव्हा त्यांची पहिली पत्नी सुजाता बिडला यांचं निधन झालं होतं. विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता.यानंतर जय मेहता फार एकटे पडले होते.

१९९२ साली जुही 'कारोबार'सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. राकेश रोशन सिनेमाचे दिग्दर्शक होते. जय मेहता राकेश रोशन यांचे चांगले मित्र होते. शूटिंगच्यावेळी जय मेहता आणि जुहीची ओळख झाली. मात्र तेव्हा त्यांच्यात फार काही घडलं नाही.

काही वर्षांनंतर जुही आणि जय मेहता पुन्हा भेटले. तेव्हा जुहीला समजले की जय यांच्या पत्नीचं निधन झालं आहे. यानंतर जुहीचं त्यांच्याप्रती वागणं थोडं बदललं. पुढे दोघांमध्ये मैत्री झाली. हळूहळू दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले.

जुही आणि जय यांनी लग्नाचा विचार केला मात्र तेव्हाच जुहीच्या आईचं कार अपघातात निधन झालं. यानंतर जुही पुरती कोलमडली होती. अशा परिस्थितीत ती लग्नाचा निर्णय घेऊ शकत नव्हती. या दु:खातून सावरण्यासाठी जय मेहता यांनी तिची मदत केली.

यानंतर अखेर १९९५ साली दोघांनी लग्नगाठ बांधली. पैशांसाठी म्हाताऱ्यासोबत लग्न केलं अशी टीकाही तेव्हा तिच्यावर झाली. आज २८ वर्षांनंतरही त्यांचा सुखी संसार सुरु आहे. त्यांना जान्हवी आणि अर्जुन ही दोन मुलं आहेत.

जुही शाहरुख खानसोबत आयपीएल टीम 'कोलकाता नाईट रायडर्स'ची मालकीण आहे. अनेकदा ती टीमला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियममध्ये हजर असते.