लग्न लावण्यासाठी पुजाऱ्याला झोपेतून उठवलं अन्.. रेखा यांच्या लग्नाची ही गोष्ट माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 01:35 PM2023-08-22T13:35:04+5:302023-08-22T13:47:25+5:30

मुंबईतल्या एका मंदिरात रेखा आणि मुकेश अग्रवाल यांनी रात्री साडेदहा वाजता लग्न केलं होतं.

रेखा (Rekha) बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री आहेत. त्यांच्या अभिनयाने आणि सौंदर्याने भल्याभल्यांना भुरळ घातली. सिनेसृष्टीत ७० ते ८० चा काळ त्यांनी गाजवला. रेखा यांना सिनेमात घेण्यासाठी निर्मात्यांमध्ये चढाओढ असायची.

रेखा यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट सिनेमे दिले. 'खूबसूरत','घर','उमराव जान','मुकद्दर का सिकंदर','सिलसिला' असे एकापेक्षा एक ब्लॉकबस्टर चित्रपट केले. मात्र हे त्यांचं प्रोफेशनल आयुष्य किती जरी यशस्वी असलं तरी वैयक्तिक आयुष्यात त्या कायम एकट्याच पडल्या.

रेखा यांचं १९९० मध्ये मुकेश अग्रवाल (Mukesh Agarwal) यांच्याशी लग्न झालं होतं. त्यांनी अचानक लग्न केल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. मुकेश अग्रवाल हे रेखाच्या पाहताच क्षणी प्रेमात पडले होते. रेखा यांनी लग्नाला होकार देताच ते आनंदाने वेडे झाले.

रेखा आणि मुकेश यांच्या लग्नाची स्टोरीच वेगळी आहे. रेखा लोकप्रिय अभिनेत्री असल्याने त्यांच्या लग्नाची खबर माध्यमांना लागणार हे साहजिक होतं. मुकेश यांना मात्र रेखाशी लग्न करण्याची खूपच घाई होती. ते थांबूच शकत नव्हते.

म्हणून रेखा आणि मुकेश दोघंही रात्री साडेदहाच्या वेळी जुहू येथील इस्कॉन मंदिरात गेले. मंदिरात तेव्हा काही लोक होते ज्यांनी रेखाला ओळखलं असतं. मग मुकेश यांना समोरच असलेलं मुक्तेश्वर मंदिर दिसलं. मुकेश आणि रेखा मुक्तेश्वर मंदिरात गेले. रात्र झाली असल्याने पुजारी मंदिराच्या आवारातच असलेल्या घरी झोपले होते.

मुकेश यांनी अक्षरश: पुजाऱ्यांना झोपेतून उठवलं आणि लग्न लावायचं आहे असं सांगितलं. समोर रेखा यांना बघून पुजाऱ्यांनाही धक्का बसला. एवढ्या रात्री गाभाऱ्याचे दरवाजे उघडण्याची परवानगी नाही असं पुजाऱ्याने सांगितलं. पण रेखा यांच्या लग्नासाठी नियमच मोडण्यात आला.

अखेर रेखा आणि मुकेश यांचं लग्नबंधनात अडकले. मुकेश रेखाकडे नेहमी काही ना काही हट्ट करायचे. आपण इतर सेलिब्रिटींना लग्नाबद्दल कळवू असं म्हणत ते हट्टाने हेमा मालिनी यांच्याही घरी गेल्याची चर्चा तेव्हा झाली होती. तसंच एकदा तर त्यांनी रेखा यांच्याकडे राजीव गांधींना भेटण्याचा हट्ट केला होता.

मुकेश यांच्या अशा वागण्याला रेखा प्रचंड वैतागल्या होत्या. त्या मुकेश यांना सोडून स्वत:च्या घरी येऊन राहू लागल्या. दरम्यान मुकेश प्रचंड डिप्रेशनमध्ये गेले होते. त्यांनी एकदा झोपेच्या गोळ्या खाऊन स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात ते वाचले.

अखेर २ ऑक्टोबर १९९० रोजी त्यांनी रेखाच्याच ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. लग्नानंतर ११ महिन्यातच त्यांनी जीवनयात्रा संपवली. यानंतर रेखावर 'व्हॅम्प'असल्याचा ठपका लागला होता.