इनकम टॅक्स वाद, ३ मुलांच्या वडिलांवर जडलं प्रेम; 'दुसरी महिला'चा लागला टॅग, अभिनेत्रीचं वादग्रस्त आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 01:43 PM2024-03-05T13:43:39+5:302024-03-05T13:56:36+5:30

नुकतंच अभिनेत्रीला फरार घोषित करण्यात आलं, अखेर आता कोर्टात लावली हजेरी

80 ते 90 चं दशक गाजवणारी ही अभिनेत्री सध्या चांगलीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीला न्यायालयाने फरार घोषित केले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी अभिनेत्री विरोधात दोन ठिकाणी तक्रार दाखल आहे.

ही अभिनेत्री म्हणजे जया प्रदा (Jaya Prada). त्यांचं खरं नाव ललिता रानी असं आहे. अभिनयात पदार्पण केल्यानंतर त्यांनी नावात बदल केला. जया प्रदा यांनी तेलुगसह वेगवेगळ्या ५ भाषांमध्ये १५० हून जास्त सिनेमे केले आहेत. काही काळासाठी त्या सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रीही होत्या.

जया प्रदा अनेक गोष्टींमुळे विवादात अडकल्या आहेत. मग ते वैयक्तिक आयुष्य असो किंवा प्रोफेशनल. आतापर्यंत कोणकोणत्या वादांमध्ये त्यांचं नाव आलं आहे बघुया.

सिनेमांसाठी सर्वात जास्त मानधन घेताना त्या इनकम टॅक्सच्या रडारवर आल्या होत्या. त्यांच्या आयुष्यात हे मोठं वादळच आलं होतं. मात्र यातून त्यांची सुटका करण्यासाठी निर्माते श्रीकांत नाहटा पुढे सरसावले.

श्रीकांत नाहटा यांनी जया प्रदा यांना इनकम टॅक्स वादातून बाहेर काढले. तसंच त्यांना मानसिकरित्याही धीर दिला. दरम्यान हळहळू त्यांच्यात जवळीक वाढली. जया प्रदा श्रीकांत यांच्या प्रेमात पडल्या. जेव्हा दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला तेव्हाही मोठा वाद झाला.

श्रीकांत नाहटा हे विवाहित होते आणि तीन मुलांचे वडील होते. १९८६ साली श्रीकांत आणि जया प्रदा यांनी लग्न केले. लग्न झाले तरी श्रीकांत यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नव्हता. त्यामुळे जया प्रदा यांना कायम दुसरी महिला असाच टॅग लागला.

इतकंच नाही तर जया प्रदा यांना कधीच आई होण्याचं सुख मिळालं नाही. लग्न करुनही त्या कायम एकट्याच राहिल्या. अशातच त्यांनी मुलाची कमतरता दूर करण्यासाठी बहिणीचा मुलगा सिद्धार्थला दत्तक घेतले.

फिल्मी करिअरनंतर जया प्रदा यांनी राजकारणात एन्ट्री घेतली. 1994 साली 'तेलुगू देसम पार्टी'मध्ये त्यांनी प्रवेश केला. तर 1996 साली त्या राज्यसभेवर गेल्या. मात्र नंतर पुन्हा राज्यसभा न मिळाल्याने त्यांनी पक्ष सोडला.

2004 साली त्यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला. 2004 ते 2014 पर्यंत त्यांनी रामपूरच्या खासदार होत्या. नंतर त्या भाजपात गेल्या. बीजेपीच्या तिकीटावर त्यांनी 2019 मध्ये निवडणूक लढवली मात्र त्यांचा पराभव झाला.

2019 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर खटले दाखल आहेत. रामपूर कोर्टाने त्यांना सात वेळा कोर्टात हर राहण्याचे आदेश देऊनही त्या आल्या नाहीत. म्हणून त्यांना फरार घोषित करण्यात आले. फरार घोषित करताच त्यांनी अखेर काल रामपूर कोर्टात हजेरी लावली. सध्या त्या या प्रकरणामुळे चर्चेत आहेत.