पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सुरक्षेची मागणी करणाऱ्या अभिनेत्री पायल घोषवर जीवघेणा हल्ला; जाणून घ्या प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 05:43 PM2021-09-21T17:43:52+5:302021-09-21T17:50:20+5:30

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप लावणारी अभिनेत्री पायल घोष पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप लावणारी अभिनेत्री पायल घोष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अभिनेत्रीने एक व्हिडीओ जारी करत तिच्यावर मुंबईतील अंधेरी भागात जीवघेणा हल्ला झाल्याचा दावा केला आहे. अज्ञातांकडून हा हल्ला करण्यात आला.

या व्हिडीओत पायल घोष म्हणते की, दोन दिवसांपूर्वी ती तिच्या कारमधून जात होती. तेव्हा काही लोकांनी लोखंडी रॉडने तिच्यावर हल्ला केला. त्या अज्ञात लोकांच्या हातात एक बॉटलही होती कदाचित त्यात ॲसिड असल्याची शंका तिने उपस्थित केली.

पायल या हल्ल्यात थोडक्यात बचावली असली तरी तिच्या डाव्या हाताला दुखापत झाल्याचं सांगण्यात येते. जेव्हा ती एका मेडिकलमध्ये औषध घेण्यासाठी गेली होती तेव्हा काही अज्ञात ज्यांनी चेहरे लपवलेले होते त्यांनी पायलवर हल्ला करण्यात आल्याचं तिने सांगितले.

पायल घोषनं(Payal Ghosh) या प्रकरणात FIR नोंदवली आहे. तिने व्हिडीओत म्हटंलय की, जेव्हा मी औषधं खरेदी करून झाल्यानंतर कारच्या ड्रायव्हर सीटवर बसण्याचा प्रयत्न केला तितक्यात काही लोक माझ्या अंगावर धावून आले आणि हल्ला केला.

या अज्ञातांच्या हातात एक बॉटलही होती. त्यात काय होते हे माहिती नाही. त्या लोकांनी मला रॉडने मारण्याचाही प्रयत्न केला. मी त्यांना ढकलून तिथून पळाली आणि ओरडण्यास सुरुवात केली. तेव्हा एकाने मारलेला रॉड माझ्या डाव्या हातावर लागला. मी ओरडली तसं त्यांनी तिथून पळ काढला.

काही महिन्यांआधी अभिनेत्री पायल घोष हिने रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला होता. या घटनेची माहिती मिळताच रामदास आठवले यांनी पायल घोषची तिच्या राहत्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी स्थानिक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते.

अभिनेत्री पायल घोष यांच्या जीवाला धोका असून त्यांना पोलीस संरक्षण दिले पाहिजे अशी मागणी रिपाइंच्या वतीने करण्यात आल्याचं रामदास आठवले म्हणाले. अभिनेत्री पायल घोष यांनी वर्षभरापूर्वी दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यावर आरोप करीत पोलीस तक्रार केली होती.

तेव्हा रिपब्लिकन पक्षाने पायल घोष यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे पायल घोष यांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडी च्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी पायल घोष यांची निवड करण्यात आली होती. पायल घोष यांच्याबर झालेल्या हल्ल्याचा निषेध करून चौकशी करण्याची आणि अभिनेत्री पायल घोष यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

मागील वर्षी पायलने ट्विट करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुरक्षेची मागणी केली होती. ही माफिया गँग मला जीवे मारेल असे पायलने तिच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. ‘ही माफिया गँग मला मारून टाकेल सर आणि माझ्या मृत्यूला आत्महत्या वा अन्य काही सिद्ध केले जाईल,’असे तिने तिच्या ट्विटमध्ये लिहिलं होतं.

‘अनुराग कश्यपने माझ्यासोबत जबरदस्ती केली आणि गैरवर्तन केले. पीएमओ आणि नरेंद्र मोदीजी यावर अ‍ॅक्शन घ्या. या क्रिएटीव्ह व्यक्तीच्या मागे लपलेला राक्षस देशाला दाखवा. मला हे माहीत आहे की, तो मला नुकसान पोहोचवू शकतो आणि माझी सुरक्षा धोक्यात आहे. कृपया माझी मदत करा,’असे ट्विट करत पायलने खळबळ निर्माण केली होती. यानंतर तिने अनुरागविरोधात एफआयआर दाखल केला होता.