‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 22:17 IST2025-09-15T22:12:31+5:302025-09-15T22:17:01+5:30
MNS Chief Raj Thackeray First Reaction on Dashavatar Marathi Movie: दिलीप प्रभावळकर खूप मोठे आहेत. त्यांनी कमाल केली आहे. महाराष्ट्रातील गंभीर विषयाला या चित्रपटाने हात घातला आहे, असे सांगत राज ठाकरे यांनी ‘दशावतार’ टीमचे कौतुक केले आहे.

‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
MNS Chief Raj Thackeray First Reaction on Dashavatar Marathi Movie: गेल्या काही दिवसांपासून ‘दशावतार’ या मराठी चित्रपटाची सर्वत्र चर्चा असल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियातही या चित्रपटाचे कौतुक केले जात आहे. कोकणातील कांतारा असेही या चित्रपटाचे वर्णन केले जात आहे. अमराठी रसिक-प्रेक्षक, सोशल मीडिया यांनाही ‘दशावतार’ मराठी चित्रपटाची दखल घेतलेली दिसत आहे. बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट चांगली कामगिरी करत आहे. अशातच कला, चित्रपट, कलाकार यांविषयी आस्था, कदर आणि उत्तम माहिती असलेल्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ‘दशावतार’ चित्रपट पाहिला. हा चित्रपट पाहिल्यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली.
८१व्या वर्षीही व्यसनापासून दूर कसे राहिले दिलीप प्रभावळकर? अभिनेत्याने दिलं मजेशीर उत्तर, म्हणाले...
राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर ‘दशावतार’ चित्रपटाविषयी भाष्य केले आहे. दशावतार या चित्रपटात गंभीर विषयाला हात घालण्यात आला आहे. गेली अनेक वर्ष मी माझ्या भाषणांमधून ही गोष्ट महाराष्ट्राला सतत सांगत आलो आहे की, आपल्याकडच्या जमिनी वाचवा. कारण जमिनी हे तुमचे अस्तित्व आहे. हा संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे. ही गोष्ट फक्त एकट्या कोकणामध्ये होत आहे, असा भाग नाही. महाराष्ट्रातील जमिनींचा हा विषय आहे आणि सुबोधने अत्यंत चलाखीने हा विषय चित्रपटाच्या माध्यमातून मांडला आहे आणि दशावताराच्या सर्व रुपांमधून ती गोष्ट आणली आहे, या शब्दांत राज ठाकरे यांनी या चित्रपटाबाबत कौतुकोद्गार काढले.
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
महाराष्ट्राने बोध घ्यावा, असा हा चित्रपट आहे
अर्थात मी चित्रपटाची कथा सांगत नाही. अत्यंत उत्कृष्ट छायाचित्रण, संगीत आणि दिग्दर्शक सुबोध जरी असला, तरी महाराष्ट्राने बोध घ्यावा, असा हा चित्रपट आहे. दिलीप प्रभावळकर यांनी उत्तम काम केले आहे, हे वाक्य अत्यंत छोटे आहे. ते खूप मोठे आहेत. त्यांनी कमाल केली आहे. चित्रपटातील बाकीच्या कलावंतांनी चांगली कामे केली आहेत. महेश मांजरेकर यांनी उत्तम काम केले आहे. साजेसे काम केले आहे. प्रियदर्शनी त्यांनीही चांगले काम केले आहे. या चित्रपटात मनोरंजन असले तरी, महाराष्ट्रातील गंभीर विषयाला या चित्रपटाने हात घातला आहे, यासाठी महाराष्ट्राने हा चित्रपट नक्की पाहायला पाहिजे, असे आवाहन राज ठाकरे यांनी प्रेक्षकांना केले आहे.
दरम्यान, ‘दशावतार’ चित्रपट १२ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटातून दिलीप प्रभावळकर यांनी पुन्हा एकदा त्यांच्या अभिनयाच्या ताकदीचे दर्शन घडवत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. कोकणातील परंपरा आणि दिग्गज अभिनेत्याच्या अभिनयाने नटलेला ‘दशावतार’ चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी पहिल्या दिवसापासूनच गर्दी केली आहे.