"अख्ख्या महाराष्ट्राचं मन जिंकलंस...", 'झापुक झुपूक'च्या प्रदर्शनापूर्वी सूरज चव्हाणने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 11:18 IST2025-04-18T11:15:09+5:302025-04-18T11:18:10+5:30
सध्या मराठी मनोरंजनविश्वात केदार शिंदे दिग्दर्शित 'झापुक झुपूक' (Zhapuk Zhupuk) सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे.

"अख्ख्या महाराष्ट्राचं मन जिंकलंस...", 'झापुक झुपूक'च्या प्रदर्शनापूर्वी सूरज चव्हाणने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत
Suraj Chavan Video: सध्या मराठी मनोरंजनविश्वात केदार शिंदे दिग्दर्शित 'झापुक झुपूक' (Zhapuk Zhupuk) सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे. लवकरच या सिनेमाच्या माध्यमातून गुलिगत किंग सूरज चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वातून नावारुपाला आलेला हा बारामतीचा पठ्ठ्या आता प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. त्यामुळे सूरज चव्हाण (Suraj Chavan) प्रसिद्धीझोतात आला आहे. अशातच 'झापुक झुपूक'च्या रिलीजपूर्वी सूरजने सोशल मीडियावर एका शेअर केलेल्या व्हिडीओने चाहत्यांचं पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्यांच तोंडभरून कौतुक केलं आहे.
नुकताच सूरज चव्हाणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सुंदर असा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये गुलिगत किंग आपल्या चित्रपटातील दिग्गज कलाकारांचे आशीर्वाद घेताना दिसतो आहे. विशेष म्हणजे सूरज चव्हाण लक्ष्मीकांत बेर्डे, नाना पाटेकर, दादा कोंडके, व्ही शांताराम यांच्यापुढे नतमस्तक झाला. अंधेरी पश्चिम येथे स्वर्गीय रमेश देव मार्गावर ' मराठी सिनेसृष्टी कट्टा' आहे याठिकाणी मराठी सृष्टीतील दिग्गजांचे भित्तिचित्र आहेत. सूरज चव्हाण त्याच्या 'झापुक झुपुक' चित्रपटानिमित्त या दिग्गजांपुढे नतमस्तक झाला. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओला सूरजने कॅप्शन देत म्हटलंय की, "मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकारांचा आशीर्वाद घेऊन अभिमानाने सादर करत आहे, झापुक झुपूक २५ एप्रिल पासून आपल्या जवळ च्या चित्रपट गृहात… आख्यांच असंच प्रेम राहुद्या..." असं त्यांने या व्हिडीओद्वारे म्हटलं आहे. त्याच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्स करत लिहिलंय की, अख्या महाराष्ट्राचे मन जिंकलास भावा व्हिडिओ टाकून तसेच आणखी एका नेटकऱ्याने म्हटलंय, कलाकारीतलं देव...". अशा चाहत्यांच्या प्रतिक्रिया व्हिडीओवर उमटल्या आहेत.
दरम्यान, मराठी मातीतल्या सूरज चव्हाणला चित्रपटामध्ये पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून आलेला सूरजचा साधाभोळा स्वभाव प्रत्येकाला भावला आहे. आता सूरज चव्हाण 'झापुक झुपूक' च्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. सिनेमात सूरज चव्हाण मुख्य भूमिकेत असून जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे,पायल जाधव,दीपाली पानसरे, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी अशी सिनेमाची स्टारकास्ट आहे.