"आता दुसरा पर्याय शोधायला हवा", 'वेड' फेम अभिनेत्रीला २ वर्षांपासून मिळत नाहीये काम, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 14:12 IST2025-12-19T14:11:29+5:302025-12-19T14:12:39+5:30
गेल्या दोन वर्षांपासून जियाला काम मिळत नाहीये. याबद्दल अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत खंत व्यक्त केली आहे.

"आता दुसरा पर्याय शोधायला हवा", 'वेड' फेम अभिनेत्रीला २ वर्षांपासून मिळत नाहीये काम, म्हणाली...
अभिनेत्री जिया शंकर वेड सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आली होती. जियाने काही मालिका, सिनेमा आणि वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. 'मेरी हानिकारक बीवी', 'काटेलाल अँड सन्स', 'पिशाचिनी' या मालिकांमध्ये ती झळकली आहे. तर काही साऊथ सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे. पण गेल्या दोन वर्षांपासून जियाला काम मिळत नाहीये. याबद्दल अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत खंत व्यक्त केली आहे.
जियाने काही फोटो शेअर केले आहेत. पोस्टमध्ये ती म्हणते, "या आठवणीत पुन्हा रमताना मला जाणवलं की अभिनयाला सुरुवात केल्यापासून इतक्या वर्षांत माझ्यात किती संयम आणि कृतज्ञता आली आहे. इतर कलाकारांप्रमाणेच माझ्याही आयुष्यात चढउतार आले. पण गेली दोन वर्ष माझ्यासाठी कामाच्या दृष्टीने, माझ्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने कठीण काळ होता. चित्रपट प्रदर्शित होईल याची वाट पाहत होते. पण तेही झालं नाही. कदाचित मी यासाठी बनलेलीच नाही, कदाचित इथपर्यंतच माझा प्रवास असेल, कदाचित अभिनयाव्यतिरिक्त दुसरा पर्याय शोधायला हवा, असे कित्येक विचार मनात येऊन गेले".
"पण इथपर्यंत पोहोचल्यानंतर एक गोष्ट मला नक्की कळली आहे ती म्हणजे कॅमेऱ्यासमोर उभं राहणं, अभिनय करणं, कुणाच्या तरी कथा सांगणं आणि त्या पात्राला स्वतःमध्ये शोधून व्यक्त करणं याइतकं प्रेम मी कधीच कुणावर किंवा कशावर केलेलं नाही. यामुळे मला आत्मविश्वासापेक्षा जास्त काहीतरी मला मिळालं आहे. ती ६ वर्षांची लाजरी, सतत टीका झालेली, त्रास सहन करणारी मुलगी आज फक्त आनंदी आहे. तिला तिचा अभिमान आहे आणि तिला माहीत आहे की काहीही झालं तरी ती ठीकच असणार आहे", असंही पुढे तिने म्हटलं आहे.
जिया पुढे म्हणते, "मी स्वतःसाठी लढायला शिकले, स्वतःवर प्रेम करायला, स्वतःचं कौतुक करायला आणि थोडंसं का होईना, स्वतःवर संशय घेणं थांबवायला शिकले. अजून खूप प्रवास करायचा आहे पण मी फक्त आशा करू शकते. जरी इथेच सगळं थांबलं, तरीही मला समाधान आहे की मला जे करायला मनापासून आवडतं, ते करण्याची संधी मला मिळाली. मी कायमच अभिनयावर प्रेम करणारी एक मुलगी असेन".