प्रेमळ 'आई'ला आधुनिक 'एआय' आव्हान देणार? सिनेमातच दडलंय ‘उत्तर’
By ऋचा वझे | Updated: December 11, 2025 14:18 IST2025-12-11T14:17:15+5:302025-12-11T14:18:43+5:30
'उत्तर' सिनेमात नक्की आहे तरी काय? कलाकारांशी दिलखुलास संवाद

प्रेमळ 'आई'ला आधुनिक 'एआय' आव्हान देणार? सिनेमातच दडलंय ‘उत्तर’
‘उत्तर’ या आगामी मराठी सिनेमातून लेखक क्षितिज पटवर्धनने दिग्दर्शनातही पदार्पण केलं आहे. आई आणि ‘जेन झी’ मुलातलं नातं सिनेमातून उलगडण्यात आलं आहे. रेणुका शहाणे, अभिनय बेर्डे आणि ऋता दुर्गुळे मुख्य भूमिकेत आहेत. १२ डिसेंबर रोजी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. यानिमित्त कलाकारांनी ‘लोकमत फिल्मी’शी संवाद साधला
आई आणि मुलाच्या नात्यावर याआधीही सिनेमे आले. ‘उत्तर’मध्ये काय वेगळं पाहायला मिळणार?
दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन - आजकाल एआय माणसाची बरीच कामं करतोय असं आपण म्हणत आहे. मग आपल्या आयुष्यातल्या ‘आई’ या महत्वाच्या व्यक्तीला एआय आव्हान देऊ शकेल का? इथूनच कथेचा प्रवास सुरु झाला. जगातलं सर्वात जुनं नातं आणि जगातलं सर्वात नवीन तंत्रज्ञान यांचा संगम सिनेमात आहे. यामुळे काय होतं याचं 'उत्तर' पालकांना आणि मुलांनाही सिनेमातून मिळेल.
सिनेमात तु रेणुका शहाणेंच्या मुलाच्या भूमिकेत आहेस. कसा होता अनुभव?
अभिनय बेर्डे - माझी सिनेमात निनाद ही २० वर्षांच्या तरुणाची भूमिका आहे. आईवर सतत चिडचिड करणारा हा मुलगा आहे. आईचं महत्व काय हे कळत नसल्याने तो तिला गृहित धरत असतो. सिनेमात निनाद एआयचं शिक्षण घेत असतो. या सिनेमासाठी आठवडाभर आधी मी एआयचे क्लासेस, वर्कशॉप्स केले होते. मला त्याचं खरंच ज्ञान आहे हे प्रेक्षकांना पटवून देणं महत्वाचं होतं. त्यासाठी मला या वर्कशॉप्सची मदत झाली.
रेणुका ताई मला मी लहान असल्यापासून ओळखते. पण पहिल्यांदाच आम्ही एकत्र काम केलं त्यामुळे थोडं दडपण होतंच. ती खूप दिलखुलास, हसतमुख आहे. कॅमेऱ्यासमोर ती अशी जादू करते की आपण बघतच राहतो. काहीही झालं तरी तिच्या चेहऱ्यावर हसू असतंच जे मी तिच्याकडून शिकलो.
सिनेमातील तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील?
ऋता दुर्गुळे - माझी क्षिप्रा ही भूमिका आहे जी निनादची लहानपणापासूनची मैत्रीण आहे. निनादची आई त्याची इतकी काळजी घेत असते हे क्षिप्रा तिसऱ्या नजरेतून पाहत असते. कारण क्षिप्राला आईचं अशा प्रकारे प्रेम मिळत नसतं. त्यामुळे निनादला त्याच्या आईचं महत्व पटवून देण्याचं काम क्षिप्रा करत असते. त्याला जी समज नसते ती क्षिप्राला आहे. संपूर्ण सिनेमात ती निनादला हे सांगण्याचा प्रयत्न करते. सोबतच तिचाही एक प्रवास सुरु असतो जो बघून तुम्हाला नक्कीच मजा येईल.
सिनेमा का पाहावा?
क्षितीज पटवर्धन- तुमच्या आईसोबत तुम्ही बाहेर पडण्यासाठीचं सगळ्यात मोठं निमित्त म्हणजे हा सिनेमा आहे. सिनेमा पाहून तुमच्या नातं आणखी प्रगल्भ होईल. समृद्ध आणि श्रीमंत करणारा अनुभव घेण्यासाठी हा सिनेमा बघता येईल. मराठीत सशक्त कथानकांची मोठी परंपरा आहे ज्यात स्त्रीची भूमिका महत्वाची आहे. ती संस्कृती पुन्हा आणण्याचा हा प्रयत्न केला आहे.