"तीच्या अचानक जाण्याने... " तेजस्विनी पंडितची भावुक पोस्ट, म्हणाली "देव बरे करो..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 09:56 IST2025-08-26T09:47:59+5:302025-08-26T09:56:00+5:30
तेजस्विनीने सोशल मीडियावर भावुक पोस्ट लिहिली आहे.

"तीच्या अचानक जाण्याने... " तेजस्विनी पंडितची भावुक पोस्ट, म्हणाली "देव बरे करो..."
ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे १६ ऑगस्ट रोजी निधन झाले. त्या ६९ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने मराठी नाटक आणि सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. विशेषतः ज्या मालिकेमुळे त्या घराघरात पोहोचल्या, त्या 'ठरलं तर मग' मालिकेच्या टीमला त्यांच्या जाण्याने खूप दुःख झाले आहे. त्यांच्या आठवणीत मालिकेच्या सेटवर 'सदाफुली' लावून एक भावनिक क्षण साजरा करण्यात आला.
ज्योती चांदेकर यांनी 'ठरलं तर मग' मालिकेत 'पूर्णा आजी'ची भूमिका साकारली होती. त्यांच्या अचानक जाण्याने मालिकेतील सर्व कलाकार दु:खी आहेत. काल या लोकप्रिय मालिकेने ९०० भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. हा आनंदाचा क्षण असला तरी मालिकेच्या संपूर्ण टीमच्या डोळ्यांत अश्रू आहेत. कारण हा सोहळा साजरा करण्यासाठी पूर्णा आजी नाहीत. यामुळं त्यांच्या आठवणीत 'ठरलं तर मग' सेटवर सदाफुलीचं रोपटं लावण्यात आलं. यावर ज्योती चांदेकर यांची लेक अभिनेत्री तेजस्विनी पंडितने भावुक इन्टाग्राम स्टोरी शेअर केली. तेजस्विनीने आपल्या आईच्या सहकाऱ्यांचे आभार मानले. तिने लिहिले, "तीच्या अचानक जाण्याने बऱ्याच गोष्टी बदलाव्या लागल्या असतील, पण तिचं तुमच्यावर असलेलं प्रेम तसंच राहील. देव बरे करो. जुई आणि 'ठरलं तर मग'ची टीम".
'ठरलं तर मग'मधील मुख्य अभिनेत्री जुई गडकरीनं म्हटलं, "आज 'ठरलं तर मग'चे ९०० भाग पूर्ण झाले. आज सेटवर केक कापून, आजीच्या नावाची 'सदाफुली' लावून दिवस साजरा केला. ती हे बघायला हवी होती. पण तिचे आशीर्वाद नक्की आहेत".
दरम्यानं, ज्योती चांदेकर यांचे पार्थिव १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टी सामील आहे.