‘फुले’ चित्रपटावरून वादळ, प्रदर्शन आणखी लांबणीवर, ॲड. आंबेडकर म्हणाले... चित्रपट आहे तसा दाखवावा, अन्यथा आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 07:56 IST2025-04-12T07:55:37+5:302025-04-12T07:56:44+5:30
'Phule' Movie: महात्मा जोतिबा फुले यांच्या आयुष्यावर आधारित येऊ घातलेला ‘फुले’ या चरित्रात्मक हिंदी चित्रपटामुळे सांस्कृतिक आणि राजकीय वादळ उठले आहे. या चित्रपटातील काही दृश्ये वगळावीत, अशी मागणी ब्राह्मण महासंघाने केल्यानंतर सेन्सॉर बोर्डानेदेखील त्याचीच री ओढल्यानंतर राजकीय नेतेमंडळी तसेच सामाजिक क्षेत्रातून आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या.

‘फुले’ चित्रपटावरून वादळ, प्रदर्शन आणखी लांबणीवर, ॲड. आंबेडकर म्हणाले... चित्रपट आहे तसा दाखवावा, अन्यथा आंदोलन
मुंबई/पुणे - महात्मा जोतिबा फुले यांच्या आयुष्यावर आधारित येऊ घातलेला ‘फुले’ या चरित्रात्मक हिंदी चित्रपटामुळे सांस्कृतिक आणि राजकीय वादळ उठले आहे. या चित्रपटातील काही दृश्ये वगळावीत, अशी मागणी ब्राह्मण महासंघाने केल्यानंतर सेन्सॉर बोर्डानेदेखील त्याचीच री ओढल्यानंतर राजकीय नेतेमंडळी तसेच सामाजिक क्षेत्रातून आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. महात्मा फुले यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून शुक्रवारी प्रदर्शित होणारा हा चित्रपट आता २५ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.
‘फुले’ चित्रपट जसा आहे तो तसाच पूर्णपणे दाखविण्यात यावा आणि यातील काही दृश्ये काढू नयेत; अन्यथा सेन्सॉर बोर्डासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बहुजन वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील ऐतिहासिक फुलेवाड्यात आयोजित कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर यांनी महात्मा फुले यांना अभिवादन केले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, ‘एकीकडे सरकार अभिवादन करते, तर दुसरीकडे महात्मा जोतिबा फुले यांच्या कार्यावर आधारित चित्रपटाला विरोध करते, हा विरोधाभास आहे. सेन्सॉर बोर्डाच्या माध्यमातून जातीयवादी सरकार चित्रपटातील दृश्य काढून टाकत आहे. याला आमचा तीव्र विरोध आहे.’ असेही त्यांनी सांगितले.
सेन्सॉर बोर्डाच्या सूचना
'फुले' चित्रपटाला अगोदर 'यू' प्रमाणपत्र देणाऱ्या केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने वाद सुरू झाल्यानंतर 'यू टर्न' घेत काही दृश्ये आणि संवादांमध्ये बदल सुचवले. पेशवाईला 'राजेशाही' असे म्हटले गेले आहे. 'मांग', 'महार', 'मनूची जातिव्यवस्था' या शब्दप्रयोगांमध्ये बदल करण्यास सांगितले आहे.
कोणत्या दृश्यावर आक्षेप?
सावित्रीबाई फुले यांच्यावर एक ब्राह्मण मुलगा चिखल फेकत असल्याचे 'फुले' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. हे नकारात्मक दाखवण्याची गरज नाही. हे जातीय द्वेषाकडे नेणारे आहे. याउलट शाळा घेताना एखादा ब्राह्मण मुलगा सावित्रीबाईंना मदत करत असल्याचे दृश्य असायला हवे होते, असे ब्राह्मण महासंघाचे म्हणणे आहे.
महात्मा फुले यांना मारहाण झाल्याच्या दृश्यावर फुले यांचे नातू, प्रशांत फुले यांनी आक्षेप घेतला. पहिलवान असलेले फुले आखाड्यात जायचे, दांडपट्टा खेळायचे. असे असताना त्यांना मारहाण झाल्याचे कसे दाखवले गेले? असे प्रशांत यांचे म्हणणे आहे.
फुले यांना ब्राह्मणांनी काही प्रमाणात विरोध केलाच; पण काही प्रमाणात समर्थनही केले. चांगली कामेही केली. शाळा दिली, देणगी दिली, शिक्षक दिले, विद्यार्थी दिले. ते तुम्ही दाखवले आहे की, नाही हा आमचा प्रश्न होता. चित्रपटाचे निर्माते अनंत महादेवन आणि आमचा एकमेकांत संवाद झाला आहे. चित्रपट एकांगी होणार नाही, याची काळजी घेऊ, असे त्यांनी कळवले आहे.
- आनंद दवे, अध्यक्ष, ब्राह्मण महासंघ
छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी आणि त्यांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचविण्यात महात्मा फुले यांचे योगदान मोठे आहे. सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केल्यानंतर त्यांच्यावर शेण फेकणारे, त्यांना त्रास देणारे परदेशांतून आलेले नव्हते. चित्रपटातून ही दृश्ये वगळण्यास सांगितले जात आहे. या माध्यमातून सरकार इतिहास बदलण्याचा प्रयत्न करत आहे. याचा आम्ही निषेध करतो.
- हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
सेन्सॉर बोर्डाने सांगितलेले बदल आम्ही केले आहेत. कोणतेही दृश्य वगळण्यास त्यांनी सांगितलेले नव्हते. बोर्डाने चित्रपटाला यू प्रमाणपत्र दिले आहे. लोकांनी विरोध करण्याऐवजी चित्रपट पाहावा. केवळ ट्रेलर पाहून मतप्रदर्शन करू नये. चित्रपट पाहिल्यानंतर जोतिबा फुले आणि ब्राह्मण यांच्यातील संतुलित संबंध स्पष्ट होतील.
- अनंत महादेवन, चित्रपट दिग्दर्शक