"...तर कदाचित मी स्वत:ला फासावर लटकवलं असतं", स्मिता जयकर असं का म्हणाल्या?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 13:42 IST2025-04-02T13:41:40+5:302025-04-02T13:42:11+5:30
एक अभिनेत्री असण्यासोबतच स्मिता जयकर एक अध्यात्मिक गुरूदेखील आहेत. त्यांच्या या प्रवासाबद्दल त्यांनी या मुलाखतीत सांगितलं.

"...तर कदाचित मी स्वत:ला फासावर लटकवलं असतं", स्मिता जयकर असं का म्हणाल्या?
स्मिता जयकर हे सिनेइंडस्ट्रीतील मोठं नाव आहे. असे अनेक मराठी कलाकार आहेत जे बॉलिवूडमध्येही झळकले. पण, फार कमी जणांना बॉलिवूडमध्ये स्वत:चं वेगळं अस्तित्व निर्माण करता आलं. अभिनेत्री स्मिता जयकरही अशाच कलाकारांपैकी एक आहेत. नुकतंच त्यांनी लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर शोमध्ये हजेरी लावली होती. एक अभिनेत्री असण्यासोबतच त्या अध्यात्मिक गुरूदेखील आहेत. त्यांच्या या प्रवासाबद्दल त्यांनी या मुलाखतीत सांगितलं.
अध्यात्माबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, "माझ्यामध्ये खूप बदल घडला. जी मी होते आणि जी मी आता आहे...ज्याला आपण परिवर्तन म्हणतो. ते सांगण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीयेत.पूर्वीची जी मी होते ती कुठेतरी गेलीच...ती मी आता नाहीये. आणि आयुष्यात जर हा टप्पा आला नसता किंवा बदल घडला नसता तर मी आता कदाचित जिवंतच नसते. मी स्वत:ला लटकवून घेतलं असतं. कारण, आपलं मन फालतू कारणांचा विचार करतं. त्यात सिनेइंडस्ट्रीत असल्यामुळे यातून बाहेर पडणं त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहणं, हे झालंच नसतं. त्या दलदलीतीच पडून राहिले असते. अध्यात्म माझ्या आयुष्यात नसतं तर मी कदाचित आज नसतेच".
स्मिता जयकर यांनी त्यांचे Automatic writingचे अनुभवही सांगितले. त्या म्हणाल्या, "ही एक हिलिंग प्रोसेस असते. म्हणजे शरीर सोडून गेलेल्या आत्म्यांशी संपर्क साधणे. माझ्या समोर असलेल्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यातून निघून गेलेल्या व्यक्तीच्या आत्म्यासोबत बोलायचं असेल तर त्याचं माध्यम मी असते. मला माझ्या प्रभूंनी हा आशीर्वाद दिला होता. ते जग आपल्याला माहीत नाही. त्या जगाशी संपर्क साधायचा आणि त्या आत्म्याशी बोलायचं. त्यांचा आत्मा माझ्याबरोबर बोलतो. कधीकधी आत्महत्या केलेले, अपघातात गेलेल्या व्यक्ती किंवा एखाद्या व्यक्तीसोबत आपण खूप अटॅच असतो की तो गेल्यावरदेखील आपण त्याला सोडून देत नाही. त्यांना क्लोजर मिळत नाही. आत्म्याला पुढे गती मिळण्यासाठी हे Automatic writing केलं जातं".
"मी प्राण्यांशीदेखील बोलते. शेवटी प्राण्यांमध्येही आत्मा असतो. ते सगळं सांगतात. त्यांचा मालक आजारी पडणार असेल तर कुत्री, मांजरी स्वत:वर त्यांचं आजारपण घेतात. एवढंच काय झाडातही आत्मा असतो. तुम्ही झाडाला मिठी मारली तर तेदेखील तुमच्याशी बोलेल. संपूर्ण युनिव्हर्सची आपण कनेक्टेड आहोत. पण, आपल्यामध्ये तेवढी भावनिकता नाही", असंही त्या पुढे म्हणाल्या.