"संतोष जुवेकर काही चुकीचा बोललेला नाही"; अभिनेत्याच्या ट्रोलिंगवर जयवंत वाडकर स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 18:46 IST2025-04-01T18:46:05+5:302025-04-01T18:46:44+5:30
गेल्या काही दिवसापासून संतोष जुवेकर (Santosh Juvekar) सतत चर्चेत आहे. १४ फेब्रुवारी त्याचा छावा हा चित्रपट प्रदर्शित झाला. या सिनेमात त्याने रायाजी मालगे यांची भूमिका साकारली होती.

"संतोष जुवेकर काही चुकीचा बोललेला नाही"; अभिनेत्याच्या ट्रोलिंगवर जयवंत वाडकर स्पष्टच बोलले
गेल्या काही दिवसापासून संतोष जुवेकर (Santosh Juvekar) सतत चर्चेत आहे. १४ फेब्रुवारी त्याचा छावा हा चित्रपट प्रदर्शित झाला. या सिनेमात त्याने रायाजी मालगे यांची भूमिका साकारली होती. या सिनेमातील त्याच्या कामाचं खूप कौतुक झालं. या चित्रपटाच्या निमित्ताने एका मुलाखतीमध्ये संतोषने अक्षय खन्नासोबत बोललो नव्हतो, असे सांगितले. त्यानंतर त्याला वाईटरित्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला. त्यानंतर संगीतकार, गायक अवधूत गुप्तेने यावर मत मांडत त्याला ट्रोल करु नका असे आवाहन केले होते. त्यानंतर आता प्रसिद्ध अभिनेते जयवंत वाडकर (Jaywant Wadkar) यांनी देखील संतोष जुवेकरच्या बाजूने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
जयवंत वाडकर यांनी तारांगणला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, "संतोषला मी सांगणार आहे. खरंतर मी त्याला फोन लावला होता. पण बोलणं झालं नाही. कशाला तू रिअॅक्ट करतो. नको रिअॅक्ट करुस. तुला जे वाटलं ते बोललास ना तू. संपलं. पुढचं पुढे. मला वाटतं त्याने पुन्हा रिअॅक्ट करण्यामध्ये जो वेळ घेतला ना त्यामध्ये लोकांनी त्याला आणखी ट्रोल करायला सुरुवात केली. प्रत्येकजण सध्या काहीही बोलत आहेत. मला वाटतं उत्तर द्यायला नाही. पाहिजे. आपण एकदा बोललो की बोललो. जा पुढे काय होईल ते बघू. घाबरायचं कशाला आपण काहीच चुकीचं बोललेलो नाही. "
या गोष्टी देखील आपण आठवल्या पाहिजेत - संतोष जुवेकर
तारांगणला दिलेल्या मुलाखतीत संतोष जुवेकरने त्याला ट्रोल केलं, त्यावर मौन सोडले. तो म्हणाला की, "मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, जे काही तुम्ही कुणाबद्दल शब्द वापरता ते सोशल मीडियावर असो मैत्रीत असो, चारचौघात असो किंवा बिल्डिंगमध्ये असो तुम्ही जेव्हा शब्द वापरता तेव्हा ते जपून वापरा. ते फार गरजेचं असतं. कारण आपण बोलून जातो पण, त्याचा आघात समोरच्या व्यक्तीवर ज्या पद्धतीने होतो त्याबद्दल आपल्याला कल्पना नसते. त्याच्या कुटुंबाला ते जाणवतं. थोडं समजून घ्या. मान्य आहे राग आला पाहिजे. जसं आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो तसं त्याच्यावर रागावलं देखील पाहिजे. पण, शेवटी कुठे ना कुठेतरी त्या व्यक्तीने चांगलं काम केलं असेल या गोष्टी देखील आपण आठवल्या पाहिजेत."