मराठीत कोणी 'सुपरस्टार' नाही कारण...अभिनेता संतोष जुवेकरने मांडलं स्पष्ट मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 14:48 IST2025-01-28T14:46:12+5:302025-01-28T14:48:02+5:30
संतोष जुवेकर आगामी 'छावा' सिनेमात दिसणार आहे.

मराठीत कोणी 'सुपरस्टार' नाही कारण...अभिनेता संतोष जुवेकरने मांडलं स्पष्ट मत
मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) आगामी 'छावा' हिंदी सिनेमात दिसणार आहे. याआधीही संतोषने काही हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'झेंडा', 'मोरया', 'रानटी' असे मराठीत दमदार सिनेमे देणारा संतोष जुवेकर हिंदीतही नशीब आजमावत आहे. दरम्यान मराठीत कोणी सुपरस्टार का होत नाही असा प्रश्न विचारला असता त्याने रोखठोक उत्तर दिलं आहे.
'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत संतोष जुवेकर म्हणाला, "मराठीतला प्रत्येक स्टार हा स्वतःच्या मेहनतीवर पुढे आला आहे. अंकुश असेल स्वप्नील असेल सगळेच self made आहेत. कोणी कोणाचा कोणाचा भाऊ, मुलगा किंवा बहीण नाही. थिएटर, मालिका करून मेहनत घेऊन प्रत्येक जण या स्टेजवर आला आहे. अनेक खस्ता खाऊन आला आहे. त्यामुळे आम्ही आत्ता काय करतायेत यापेक्षा काय काय करून आलोय याचा आधी विचार करा."
तो पुढे म्हणाला, "मराठीत सुपरस्टार नाही कारण लोकच एखाद्या कलाकाराला स्टार बनवत असतात. आज मी बाहेर पडून 'मी सुपरस्टार' असं ओरडून काही होणार नाही. मराठी प्रेक्षक साऊथचे डब केले हिंदी सिनेमे पाहायला गर्दी करतात. तिकडे साऊथमधले लोक त्यांच्या कलाकरांव्यतिरिक्त कोणाकडे बघतही नाहीत. त्यामुळे मराठीत कोणी सुपरस्टार हवा असेल तर ते प्रेक्षकांच्याच हातात आहे. तुम्ही जर घरच्याच लोकांना आदर दिला नाही तर काय अर्थ आहे."
"अनेकदा मराठी सिनेमांना थिएटरमध्ये स्क्रीन्स मिळत नाहीत. मला अनेकदा मित्रांचा फोन येतो अरे हा मराठी सिनेमा पाहायचा आहे. कुठे लागला आहे सांग. हेही खरंच आहे. यात निर्माते, डिस्ट्रिब्युटरची चूक वाटते. आमच्याच फ्रॅटर्निटी मधल्या लोकांची पैशांसाठी वाईट वृत्ती असते. ज्यांच्यामुळे मराठी सिनेमाला स्क्रीन्ससाठीच झगडावं लागत आहे. माझ्या महाराष्ट्रात मराठी सिनेमांची ही अवस्था आहे." असंही तो म्हणाला. संतोषने या माध्यमातून प्रेक्षकांना कळकळीची विनंती केली आहे. इतर सिनेमे पाहता तसं मराठीही पाहा असं तो म्हणाला.