"भावा, हे वय आत्महत्या करण्याचं नव्हतं...", २५ वर्षीय सचिन चांदवडेच्या आत्महत्येनंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट
By कोमल खांबे | Updated: October 28, 2025 11:01 IST2025-10-28T10:58:01+5:302025-10-28T11:01:09+5:30
मराठी सिनेसृष्टीतील २५ वर्षीय अभिनेत्याच्या आत्महत्येने सगळीकडूनच हळहळ व्यक्त केली जात आहे. अभिनेता सचिन चांदवडेने गळफास घेत आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सचिनच्या आत्महत्येनंतर मराठी अभिनेता आरोह वेलणकरने हळहळ व्यक्त करत पोस्टमधून श्रद्धांजली वाहिली आहे.

"भावा, हे वय आत्महत्या करण्याचं नव्हतं...", २५ वर्षीय सचिन चांदवडेच्या आत्महत्येनंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट
मराठी सिनेसृष्टीतील २५ वर्षीय अभिनेत्याच्या आत्महत्येने सगळीकडूनच हळहळ व्यक्त केली जात आहे. अभिनेता सचिन चांदवडेने गळफास घेत आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र त्याच्या आत्महत्येने चाहते आणि कलाकारांनाही मोठा धक्का बसला आहे. सचिनच्या आत्महत्येनंतर मराठी अभिनेता आरोह वेलणकरने हळहळ व्यक्त करत पोस्टमधून श्रद्धांजली वाहिली आहे.
आरोह वेलणकरने सचिन चांदवडेचा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. "मी त्याला ओळखत नव्हतो. पण, त्याच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर मला कसंतरीच वाटलं. किती आनंदी चेहरा आहे. मग का? भावा हे वय आत्महत्या करण्याचं नव्हतं. लोक त्यांची लढाई एकटेच लढत आहेत. त्यामुळे त्यांना जज करण्याआधी दया दाखवूया. ओम शांती मित्रा. देव तुझ्या कुटुंबीयांना यातून सावरण्याची ताकद देवो", असं म्हणत आरोहने हळहळ व्यक्त केली आहे.

सचिन चांदवडे हा जळगाव जिल्ह्यातील उंदिरखेडे येथे राहणारा होता. अभिनयाची आवड असल्याने त्याने सिनेमात करिअर करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय त्याने सॉफ्टेवेअर इंजिनिअरींगचं शिक्षण घेतलं असल्याने तो पुण्यातील आयटी पार्कमध्ये नोकरी करायचा. नोकरीतून वेळ काढत सचिनने विविध कलाकृतींमध्ये अभिनय केला. त्याने नेटफ्लिक्सवरील बहुचर्चित 'जमतारा २' वेबसीरिजमध्येही काम केलं होतं. सचिनचा आगामी सिनेमा 'असुरवन' हा लवकरच प्रदर्शित होणार होता. परंतु सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना सचिनने स्वतःचं जीवन संपवलं. सचिनने स्वतःचं आयुष्य संपवल्याने जळगाव जिल्ह्यातील एक मेहनती, हरहुन्नरी कलाकार काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना चाहत्यांमध्ये आहे.