"बँजो' सिनेमा केल्यानंतर माझं नुकसान झालं..."; रवी जाधव यांनी मनातलं सांगितलं, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 12:13 IST2026-01-08T12:04:13+5:302026-01-08T12:13:20+5:30
रितेश देशमुखचा २०१६ साली बँजो सिनेमा आला होता. याचं दिग्दर्शन रवी जाधव यांनी केलं होतं. पण हा सिनेमा केल्यानंतर रवी यांचं कसं नुकसान झालं, याविषयी त्यांनी सांगितलं.

"बँजो' सिनेमा केल्यानंतर माझं नुकसान झालं..."; रवी जाधव यांनी मनातलं सांगितलं, म्हणाले...
रवी जाधव हे मराठीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक. 'कच्चा लिंबू' सिनेमातून रवी जाधव यांनी अभिनयाची चुणुकही दाखवली. रवी जाधव यांनी दिग्दर्शित केलेले 'नटरंग', 'बालगंधर्व', 'टाईमपास' हे सिनेमे चांगलेच गाजले. यानंतर काही वर्षांपूर्वी रवी यांनी रितेशसोबत 'बँजो' हा हिंदी सिनेमा केला होता. २०१६ साली आलेला 'बँजो' हा सिनेमा मात्र बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. या सिनेमाबद्दल रवी जाधव यांनी मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
कॅचअप चॅनलला दिलेल्या मुलाखतीत रवी जाधव म्हणाले, ''मी बँजो हा सिनेमा मराठीत करणार होतो. कास्टिंग रितेश देशमुखच होते. संगीत अजय-अतुलचं होतं. हा सिनेमा तद्दन मराठी सिनेमा होता. याची गोष्ट मराठी होती. आपले मराठीत जे बँजो पथक आहेत त्यावर हा सिनेमा होता.''
''नटरंग हा तमाशावर होता तसं बँजो पथकातील जी मुलं आहेत जी लालबागचा राजा, चिंतामणीला वाजवतात त्यावर ती गोष्ट होती. करता करता हळूहळू ही गोष्ट हिंदी होत गेली. इसको और बडा करते है, म्हटलं चला, करुया. कारण निर्माते 'इरॉस' हे हिंदी होते. पुढे मग त्यातून अजय-अतुल बाहेर पडले. कारण त्यांना वेळ नव्हता. ते असते तर अजून गंमत आली असती.''
''निर्मात्यांनी खूप सपोर्ट केला. प्रचंड मोठ्या स्केलवर हा सिनेमा बनला. रितेशने प्रचंड मेहनतीने त्यात काम केलं. पण सिनेमा वर्क नाही झाला. आताही फेस्टिव्हलला ती गाणी वाजवतात. पण जी अपेक्षा होती तेवढं झालं नाही. त्यावेळी पहिली गंमत काय होती, याला दिग्दर्शन येत नाही, मराठीसाठीच ठीक आहे. त्याआधी केलेल्या अनेक जाहिराती या हिंदी आहेत. त्याला मोठेमोठे पुरस्कार मिळाले आहेत. हा सिनेमा जर आधीपासून हिंदी आहे म्हणून केला असता तर मूळात बँजो विषय घेतलाच नसता. साधं-सोपं गणित आहे.''
''या सिनेमाचा विषय हा मराठी होता. या सिनेमाचं अख्खं लिखाण, व्यक्तिरेखा सगळी मराठी मुलं होती. हे जग हरयाणा, युपी, बिहारमधल्या लोकांना कसं दाखवू? ही गोष्ट मूळात मराठी आणि महाराष्ट्रातली असल्यामुळे ती तिथे भिडली नाही. पण यामुळे माझं वैयक्तिक पातळीवर नुकसान झालं. हिंदीत मला काम मिळणं बंद झालं. आधी ऑफर्स खूप येत होत्या. बँजोनंतर हे कमी झालं.''