मराठी सिनेमांमध्ये का दिसत नाही राधिका आपटे? म्हणाली, "मला काही काळापासून..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 17:25 IST2025-12-08T17:25:07+5:302025-12-08T17:25:49+5:30
राधिका 'मीडियम स्पायसी' मराठी सिनेमात शेवटची दिसली होती.

मराठी सिनेमांमध्ये का दिसत नाही राधिका आपटे? म्हणाली, "मला काही काळापासून..."
मराठी अभिनेत्री राधिका आपटे हिंदी आणि हॉलिवूड विश्वातही सक्रीय आहे. गेल्यावर्षी तिचा 'सिस्टर मिडनाईड'सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाला आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रियता मिळाली. तिच्या अभिनयाचं विशेष कौतुक झालं. राधिकाचा जन्म पुण्यात मराठी कुटुंबात झाला. तिने 'घो मला असला हवा','लय भारी','तुकाराम','पोस्टकार्ड' या मराठी सिनमेमांमध्ये काम केलं. २०२२ साली आलेला 'मीडियम स्पायसी' हा तिचा शेवटचा मराठी सिनेमा. यानंतर ती मराठीत दिसली नाही. यावर नुकतंच राधिकाने प्रतिक्रिया दिली आहे.
राधिका आपटेचा 'साली मोहब्बत' सिनेमा रिलीज होणार आहे. यानिमित्त 'मुंबई टाईम्स'शी बोलताना राधिका आपटे म्हणाली, "सिनेमात मी स्मिता ही व्यक्तिरेखा साकारत आहे. साधी, शांत गृहिणी, बागकामात रस असणारी, नवरा आणि झाडं एवढंच तिचं आयुष्य असतं. मात्र नंतर तिच्या आयुष्यात धक्कादायक आणि रोमांचक प्रसंग येतात. याची ती कथा आहे. टिस्का चोप्राने या सिनेमातून पहिल्यांदाच दिग्दर्शनात पाऊल ठेवलं आहे."
राधिका लंडनमध्ये वास्तव्यास आहे. गेल्यावर्षीच तिने गोंडस मुलीला जन्म दिला. नवरा, लेकीचं पालनपोषणात ती व्यग्र आहे. कामासाठी ती लंडनहून भारतात येते आणि परत जाते. कामासोबत ती कुटुंबालाही वेळ देत आहे. मराठी सिनेमांमध्ये पुन्हा न दिसण्याबद्दल राधिका म्हणाली, "मला काही काळापासून मराठी सिनेमांच्या ऑफर्सच आलेल्या नाहीत. मी मराठी सिनेमांमध्ये काम करणं थांबवलेलं नाही. स्क्रिप्ट चांगली असेल तर नक्कीच मी काम करायला तयार आहे. सध्या लेकीसाठी आणि कुटुंबासाठी मी वर्षभराचा ब्रेक घेतला आहे. पण मी लवकरच काम सुरु करणार आहे."