"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 09:33 IST2025-05-05T09:32:36+5:302025-05-05T09:33:33+5:30
"७ वर्ष माझं घर याच लोकांमुळे सातत्याने चालतंय...", प्रसाद ओक कोणाबद्दल बोलतोय?

"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) गेली अनेक वर्ष मराठी इंडस्ट्रीत सातत्याने काम करत आहे. सुरुवातीला अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये तो दिसला. यासोबतच सिनेमांमधूनही त्याने आपली ओळख निर्माण केली. सध्या तो दिग्दर्शक आणि निर्मात्याच्याही भूमिकेत दिसत आहे. नुकताच त्याचा 'गुलकंद' सिनेमा रिलीज झाला आहे. यामध्ये प्रसादसोबतच सई ताम्हणकर, समीर चौघुले आणि ईशा डे यांचीही भूमिका आहे. फॅम-कॉम असलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीसही पडला आहे. दरम्यान सिनेमाच्या प्रमोशनल इव्हेंटवेळी प्रसादने केलेलं एक वक्तव्य चर्चेत आहे.
प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमध्ये परीक्षकाच्या खुर्चीवर आहेत. हा शो गेली ७ वर्ष धुमाकूळ घालत आहे आणि अजूनही याची क्रेझ कमी झालेली नाही. सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी शोचे बॅकबोन आहेत. दरम्यान याच शोमुळे प्रसाद, ईशा, समीर आणि सईची 'गुलकंद'साठी निवड झाली. नुकतंच प्रसाद सिनेमाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये म्हणाला,"कधीकधी कोणत्याही प्रोजेक्टचा फार विचार करायचा नसतो. जेव्हा सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी तुम्हाला विचारतात तेव्हा फक्त होच म्हणायचं असतं. याचं कारण गेली ७ वर्ष माझं घर या दोन माणसांमुळे चाललं आहे. २ वर्ष अवघं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळेच चाललं. त्यांना मी काहीतरी देणं लागतो. तो हा सिनेमा आहे."
तो पुढे म्हणाला,"गुलकंद सिनेमा माझ्याकडे आला तेव्हा माझी भूमिका काय रोमँटिक आहे की खलनायक आहे किंवा माझ्याबरोबर कोण आहे असं काहीही विचारायचा प्रश्नच नव्हता. मला हा चित्रपट करायचा हे फायनल होतं. काळ्या दगडावरची रेघ होती."
प्रसादने नुकतंच 'सुशीला सुजीत' सिनेमाचंही दिग्दर्शन केलं. त्याआधी तो 'जिलबी' सिनेमात दिसला. २०२२ साली त्याने दिग्दर्शित केलेल्या 'चंद्रमुखी' सिनेमाला अनेक पुरस्कार मिळाले. त्यामुळे प्रसाद सध्या अनेक भूमिका निभावताना दिसत आहे.