"दादरला अभिनेता बिड्या मारताना दिसला तर...", प्राजक्ता माळीने मांडलं स्पष्ट मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 12:49 IST2025-02-05T12:48:37+5:302025-02-05T12:49:35+5:30
'फुलवंती' च्या यशानंतर प्राजक्ता माळी काय म्हणाली?

"दादरला अभिनेता बिड्या मारताना दिसला तर...", प्राजक्ता माळीने मांडलं स्पष्ट मत
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) अनेक कारणांमुळे चर्चेत असते. कधी सिनेमामुळे तर कधी तिच्या वक्तव्यांमुळे. नुकताच तिने 'फुलवंती' हा सुपरहिट सिनेमा दिला. या सिनेमातून तिने निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवलं. प्राजक्ताच्या कामाचं खूप कौतुक झालं. पडद्यावर सतत दिसत राहणं चांगलं की मोजके प्रोजेक्ट्स करणं चांगलं असा प्रश्न तिला एका मुलाखतीत विचारण्यात आला होता. यावर तिने फार इंटरेस्टिंग उत्तर दिलं आहे.
'फुलवंती'च्या प्रमोशनदरम्यान 'मिरची प्लस'ला दिलेल्या मुलाखतीत प्राजक्ता माळीला विचारण्यात आलं की आजच्या काळात प्रोजेक्ट्सबाबतीत सिलेक्टिव्ह राहणं चांगलं आहे की नाही? यावर प्राजक्ता म्हणाली, "अतिशय चांगलं आहे. आर्थिक स्थैर्य असेल तर तुम्ही इनसिक्योर होत नाही. तुम्ही मोजकं राहू शकता. बऱ्याचदा कलाकारांना पैशांसाठी काम करण्याची वेळ येते किंवा काहींना दिसत राहण्याची एवढी ओढ असते. पण तुम्ही सातत्याने दिसत राहणं हेही कलाकारासाठी मारकच ठरु शकतं. त्यामुळे तेही बरं नव्हे."
"एक मोठे नेते म्हणतात मला जर एखादा अभिनेता दादरला शिवाजी पार्कमध्ये बिड्या मारताना दिसला तर त्याला बघायला मी थिएटरमध्ये का जाऊ? तो मला एक्सक्लुझिव्ह दिसला पाहिजे. आता रणबीर कपूरचंच उदाहरण आहे. तो मला इतका आवडतो. तो सोशल मीडियावर नाहीए. तो त्याचं वैयक्तिक आयुष्य शेअर करत नाही. त्याच्या आसपासच्या लोकांकडून त्याचं सोशल आयुष्य आपल्याला दिसतं. त्याने एका मुलाखतीत खूप चांगला मुद्दा मांडला होता की जर मी माझं आयुष्य सोशल मीडियावर टाकलं तर त्याचा परिणाम मी सिनेमात ज्या भूमिका साकारतोय त्यावर होईल. मी कसा आहे हे लोकांना कळलंच नाही पाहिजे म्हणजे मी सिनेमात मी जे दिसतो ते लोकांना स्वीकारायला सोपं जाईल. मला ते खूप आवडलं. माणूस म्हणून तुम्ही कसे आहात ते कळणं किंवा सतत दिसत राहणं या गोष्टी मारक ठरतात."