"मी अभिनय करणं थांबवलं तर.."; पद्मश्री अशोक सराफ यांचं मोठं विधान, म्हणाले- "मस्करी वाटेल, पण.."
By देवेंद्र जाधव | Updated: July 21, 2025 12:14 IST2025-07-21T12:11:15+5:302025-07-21T12:14:07+5:30
अभिनय क्षेत्र कायमचं सोडण्याबद्दल अशोक सराफ यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. त्यामुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसलाय. काय म्हणाले अशोकमामा?

"मी अभिनय करणं थांबवलं तर.."; पद्मश्री अशोक सराफ यांचं मोठं विधान, म्हणाले- "मस्करी वाटेल, पण.."
अशोक सराफ हे मराठी सिनेसृष्टीतील महानायक. अशोक सराफ यांनी विविध सिनेमातून काम केलंय. कधी खलनायक, कधी रोमँटिक तर कधी विनोदी भूमिका करुन अशोक यांनी गेली अनेक दशकं सर्वांच्या मनावर राज्य केलंय. अशोक सराफ आता ७८ वर्षांचे झाले आहेत. इतकी वर्ष मराठी, हिंदी आणि विविध भाषांमध्ये काम केल्यावर अशोक मामांच्या डोक्यात कधी निवृत्तीचा विचार आला का? याविषयी विचारला असता अशोक सराफ यांनी त्यांचं मत व्यक्त केलंय.
अमुक तमुक या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ यांना 'बास्स झालं आता अभिनय करणं थांबवूया, असं कधी वाटलं का?' असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अशोकमामा म्हणाले, "बास्स झाली अॅक्टिंग असं मी म्हणून शकत नाही. ज्या अॅक्टिंगसाठी मी लहानपणापासून धडपडलो, माझं ते ध्येय होतं त्यासाठी मी बास्स झालं कसं म्हणेल. दुसरं म्हणजे मला हे माहितीये की, मी अॅक्टिंग करणं थांबवलं तर दुसरं काही मी करु शकत नाही. बरं दुसरं मी जे काय करतोय ते यशस्वीपणे करतोय, असंही म्हणता येणार नाही. मला घरीच बसायचंय. त्यामुळे घरीच बसण्यापेक्षा काम करणं."
"आयुष्यात मी कधीही म्हणू शकत नाही की, बास्स! आता कंटाळा आला. तुम्हाला कंटाळा येतो तेव्हा त्या वेळेचा कंटाळा येतो, त्या श्रमाचा कंटाळा येतो. काम करण्याचा कंटाळा नाही येणार. माझी सगळी दुःख मी माझ्या सेटवर विसरतो. ऐकायला जरा जास्त वाटेल पण असं आहे. एकदा तिकडे प्रवेश केल्यावर सर्व गायब. सेटमधून बाहेर पडल्यावर पुन्हा सर्व आहेच. कोणाला सांगितलं तर ही मस्करी वाटेल. असं होतं का कधी, असं ते म्हणतील पण ते आहे तसंच."