अभिमानास्पद! अमेरिकन संसदेने घेतली 'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म फेस्टिव्हल २०२५'ची दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 17:56 IST2025-07-24T17:56:03+5:302025-07-24T17:56:45+5:30

या महोत्सवाची दखल अमेरिकेच्या संसदेने नुकतीच घेतली आहे. अमेरिकेतील मराठी खासदार श्री. ठाणेदार यांनी अमेरिकन संसदेतील सभागृहात या महोत्सवाची आणि आयोजक अभिजीत घोलप यांची माहिती दिली.

North American Marathi Film Festival 2025 mp shri thanedar talk about it in us sansad | अभिमानास्पद! अमेरिकन संसदेने घेतली 'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म फेस्टिव्हल २०२५'ची दखल

अभिमानास्पद! अमेरिकन संसदेने घेतली 'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म फेस्टिव्हल २०२५'ची दखल

नॉर्थ अमेरिकेत मराठी चित्रपटांना लोकप्रियता मिळावी आणि आपल्या समृद्ध मराठी संस्कृतीची महती संपूर्ण अमेरिकेतील लोकांना परिचित व्हावी या हेतूने प्रसिद्ध उद्योजक आणि 'देऊळ' आणि 'भारतीय' या चित्रपटांचे निर्माते, सुवर्ण-कमळ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित अभिजीत घोलप यांनी 'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोशिएशन'ची (नाफा) स्थापना गेल्या वर्षी केली आहे. मराठी चित्रपट, कला संस्कृतीच्या माध्यमातून दरवर्षी अमेरिकेत मराठी चित्रपटांचा भव्य सोहळा अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सॅन होजे येथे आयोजित करण्यात येतो. या महोत्सवाची दखल अमेरिकेच्या संसदेने नुकतीच घेतली आहे. अमेरिकेतील मराठी खासदार श्री. ठाणेदार यांनी अमेरिकन संसदेतील सभागृहात या महोत्सवाची आणि आयोजक अभिजीत घोलप यांची माहिती दिली. संपूर्ण माहिती दिल्यानंतर त्यांनी नाफासाठी या मराठी खासदाराकडून खूप खूप शुभेच्छा असे मराठी म्हटले आहे.  

श्री. ठाणेदार संसदेत नाफा महोत्सवाबद्दल भाषण करताना पुढे म्हणाले, "मॅडम स्पीकर, 'नाफा' या संस्थेचा उगम मराठी चित्रपटांसाठी झाला आहे. नॉर्थ अमेरिकेत या संस्थेच्या कार्यातून मराठी चित्रपट, कला आणि महाराष्ट्रातील समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या मराठी संस्कृती, परंपरांचे जतन आणि संवर्धन करण्याचे महान काम होत आहे. 'नाफा'च्या माध्यमातून अभिजित घोलप 'महाराष्ट्र' आणि 'नॉर्थ अमेरिके'साठी सांस्कृतिक दुवा ठरत आहेत, 'नाफा'साठी या मराठी खासदाराकडून खूप खूप शुभेच्छा."

हॉलिवूडच्या धर्तीवर मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक वैभव मिळवून देण्यासाठी अभिजित घोलप यांच्या दूरदर्शी संकल्पनेतून उदयास आलेल्या 'नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन' अर्थात 'नाफा'द्वारे मराठी चित्रपटांना अमेरिका-कॅनडामध्ये भव्य कॅनव्हास प्राप्त झाला आहे. हॉलिवूडच्या बेव्हर्ली हिल्सपासून अवघ्या काही मैलांवर असलेल्या ‘सॅन होजे’ येथे 'नाफा'चा यावर्षी तीन दिवसांचा अनोखा दैदिप्यमान सोहळा संपन्न होणार आहे. मराठी तारे-तारकांसोबत हॉलिवूडमधील दिग्गजांचीही उपस्थिती या महोत्सवात असणार आहे. 'स्नोफ्लॉवर', 'मुक्ताई', 'छबीला' प्रेमाची गोष्ट २ आणि 'रावसाहेब' या चित्रपटांचे नाफा महोत्सवात वर्ल्ड प्रीमियर होणार आहेत.

"नाफा फिल्म फेस्टिवल २०२५" च्या निमित्ताने येथील मराठी खासदार श्री ठाणेदार यांनी आमचे कार्य अमेरिकन संसदेच्या मार्फत प्रकाशमान केले आहे. आम्ही त्यांचे विशेष आभारी असून, त्यामुळे आमचा हुरूप अधिक वाढला आहे. कॅलिफोर्निया राज्यातील सॅन होजेचे महापौर मॅट महन, महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री ऍड. आशिष शेलार, अमेरिकेतील मराठी खासदार श्री. ठाणेदार आणि महाराष्ट्रातून या सोहळ्यासाठी खास येणाऱ्या सर्व कलावंतांच्या उपस्थितीमुळे हा सोहळा विशेष ठरेल." असे नाफाचे संस्थापक अध्यक्ष अभिजित घोलप म्हणाले. 

'नाफा'मध्ये यावर्षी २५ ते २७ जुलै रोजी सॅन होजे येथील 'द कॅलिफोर्निया थिएटर'मध्ये या भव्य मराठी चित्रपट महोत्सवाची सुरुवात होईल. २५ जुलैला 'फिल्म अ‍ॅवॉर्ड्स नाईट' रंगणार असून २६ व २७ जुलैला महोत्सवासाठी निवडलेल्या पाच  मराठी चित्रपटांचे 'वर्ल्ड प्रीमियर शोज', त्यासोबत १६ शॉर्ट फिल्म्सचे प्रीमियर, 'स्टुडंट्स सेक्शन', 'मास्टर क्लासेस', 'मीट अ‍ॅण्ड ग्रीट', 'लाईव्ह परफॉर्मन्सेस' आणि बरंच काही या महोत्सवात असणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. मोहन आगाशे, अमोल पालेकर, सचिन खेडेकर, महेश कोठारे, अश्विनी भावे, संध्या गोखले, सोनाली कुलकर्णी, गजेंद्र अहिरे, स्वप्नील जोशी, अवधूत गुप्ते, आदिनाथ कोठारे, वैदेही परशुरामी आणि मधुर भांडारकर या प्रमुख सेलिब्रिटींची उपस्थिती असणार आहे. 'नाफा' महोत्सवासाठी अमेरिकेतील ‘बीएमएम’च्या ५७ महाराष्ट्र मंडळांचे सहकार्य लाभले आहे.

Web Title: North American Marathi Film Festival 2025 mp shri thanedar talk about it in us sansad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.